पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८६
भारतीय लोकसत्ता

नेत्यांनी केले असते तर ! आपण भारताची संघटना करण्यास उद्युक्त होतांच, अखिल भरतखंड एक आहे, व आपण सर्व एक समान आहो, ही गोष्ट गृहीत धरूनच निघालों. सर्वांच्या मनांत असलेली ही भावना आतां आपल्याला फक्त दृढ करावयाची आहे. पण युरोपमध्ये ती निर्माण करण्यापासून तयारी हवी आहे. आणि ते जमणे जवळजवळ अशक्य आहे. कारण आतां तेथील भिन्न अहंकार जास्त कठीण, नास्त निबर व जास्त विसंवादी होऊन बसले आहेत. हीच गोष्ट इस्लामी देशांची आहे. तुर्कस्थान इराण, अफगाणिस्थान, आरवस्थान, बलुचिस्थान, इजिप्त हे देश आज शेकडों वर्षे इस्लामचे अनुयायी, एकधर्मी, आहेत. पण एवढा प्रदेश मिळून एक देश, अशी भावना तेथील नेत्यांना निर्माण करता आली नाहीं. इजिप्त, अरेबिया, सिरिया, ट्रॅन्सजॉर्डन हे तर एकधर्मी व एकवंशी देश आहेत. पण त्यांनाहि एक अरबराष्ट्र, एक समाज करता आला नाहीं व अजूनहि येत नाहीं. या दृष्टीने तुलना करून पाहिले म्हणजे भारताच्या प्राचीन नेत्यांच्या कार्याची महती आपल्या ध्यानांत येईल.

सहिष्णुता

 येथें ज्या अनेक जमाती होत्या व ज्या अनेक बाहेरून आल्या त्यांना, त्यांनी त्यांची धार्मिक वा सामाजिक मतें सोडली पाहिजेत असा, किंवा अमुक मते किंवा आचार पतकरले पाहिजेत असा, कसलाहि आग्रह न धरतां येथल्या समाजधुरीणांनी हिंदुत्वाच्या कक्षेत समाविष्ट करून घेतले. यासाठी त्यांनी कोणच्याहि लोकायत्त उदारमतवादी देशांत सांपडणार नाहीं इतकी परमतसहिष्णुता दाखविली आहे. नव्या समाजाने आपली सर्व धर्ममतें, श्रद्धा, आचार हीं सोडून जुन्या समाजांत विलीन होऊन गेलें पाहिजे असा आग्रह न धरतां, दोन्ही समाजाच्या मतांचें व आचारांचें कांहींसें मिश्रण घेऊन तें नवीन व्यापक रूप सर्वांनीं स्वीकारावें असें धोरण आर्यद्रविडादि नेत्यांनी स्वीकारल्यामुळे अनेक जमाती येथे परस्परांशेजारी राहून सलोख्याने नांदू लागल्या आणि मग कालांतरानें राजकीय, आर्थिक व कित्येक ठिकाणी वैवाहिक संबंधानेंहि त्यांच्यांतील अनेक जमाती एकरूप होऊं लागल्या. आर्य व असुर यांचे विवाह झाले. आर्य व