पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८५
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

योग्य नाहीं. इतका विशाल भूखंड, इतक्या विविध जमाती व इतकी कमालीची संस्कृतिभिन्नता असा योग ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणच्या लोकांनीं, तेथल्या समाजधुरीणांनीं त्या मानवसमूहाला एकरूप देण्याचे काय प्रयत्न केले व ते किती यशस्वी झाले, ते पाहून मग तुलना करावी. तशी केली तर असें दिसेल कीं, अखिल भरतखंड हा एक देश आहे व आपण सर्व हिंदु मिळून एक समाज आहौ हा जो भाव भारतीयांच्या चित्तांत येथल्या आर्यद्रविडअसुर नेत्यांनी निर्माण केला त्याला जगाच्या इतिहासांत तुलना नाहीं. हा भाव केवळ भाव म्हणूनच राहिला. त्याला प्रभावी अशा निष्ठेचे रूप आले नाहीं, हे खरे; पण एवढ्या मोठ्या मानवसमूहांत एक भाव निर्माण करणे ही गोष्ट सुद्धां कांहीं लहानसहान नाहीं. अखिल हिंदुस्थानांत आपण एक आहोत ही मनोमन साक्ष नसती तर काय झाले असतॆ, याचा विचार करावा. आज आपण संघटना करावयास निघालों त्यावेळी अखिल भरतखंड एक आहे, हे गृहीत धरून पुढे चाललो आहो. ही पूर्वपुण्याची केवढी अलौकिक जोड आहे! भावी मंदिराचा आयताच बांधून मिळालेला हा पाया किती भव्य आहे ! त्याच्या अभावी आपली युरोपसारखी किंवा दक्षिण अमेरिकेसारखी किंवा पूर्वेकडील अनाम, सयाम, जावा, सुमात्रा, बोर्निओ या प्रदेशांसारखी स्थिति झाली असती. हा सर्व मिळून एक देश आहे व आपण सर्व मिळून एक समाज आहे, हा भाव- निष्ठा तर नाहींच- पण हा भावहि- त्यांच्या स्वप्नांत कधी आलेला नाही. त्यामुळे तेथें सर्व भिन्न देशच आहेत. आज सर्व युरोपखंड हा एक देश व्हावा व सर्व युरोपियांचा एक समाज व्हावा अशी निकड तेथील विचारी नेत्यांना वाटू लागली आहे; पण ते स्वप्न पहाण्यापलीकडे आपणांस जातां येईल अशी त्यांना मुळींच आशा नाहीं. पश्चिम युरोपांतील देशांची संस्कृति व तेथील नागरिकांचे रंगरूप हें पुष्कळसें सारखे आहे. पण तेवढ्यांचा सुद्धां एक देश व एक समाज घडविणे हें अशक्यप्राय म्हणून तेथील नेत्यांना सोडून द्यावे लागत आहे. फार पूर्वीच्या काळीच आर्यद्रविडअसुर नेत्यांनी अवधान राखून येथल्या अनंत भिन्न जमातींच्या भिन्न अहंकारातून, अस्पष्ट, अस्फुट, मंद असा का होईना, पण एक अहंकाराचा सूर निर्माण करण्याचे जसे प्रयत्न केले तसे तेथील
 भा. लो.... २५