पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८४
भारतीय लोकसत्ता


हिंदु समाजाचा जन्म

 आज हिंदु समाजाचा विचार करूं लागलों म्हणजे आपण चटकन् म्हणतों कीं, हा समाज एक समाज आहे या म्हणण्याला कांहीं अर्थ नाहीं. आणि जो हिंदुसमाज आपल्याला घडावयाचा आहे त्याच्या तुलनेने आपण विचार केला तर ते अगदी खरें आहे. पण आपण जरा दुसऱ्या बाजूने विचार करावा. वर सांगितल्याप्रमाणे तुलनेने पहाण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपली टीका जरा सौम्य करावी असे आपल्याला वाटेल. युरोप खंडाचा आपण विचार करूं या. या भूभागांत आज दोनतीन हजार वर्षे अशाच अनेक जमाती येऊन रहात आहेत. त्या जमाती भारतांतल्यासारख्या एकमेकांपासून पराकाष्ठेच्या भिन्नहि नाहींत. इसवी सनाच्या सातव्या आठव्या शतकापर्यंत या सर्व ख्रिस्ताच्या अनुयायी झालेल्या आहेत. असे असून, सर्व युरोप म्हणजे एक देश आहे आणि आपण सर्व युरोपी म्हणजे एक समाज आहों, ही कल्पना तेथे वातावरणांतहि उदित झाली नाहीं. आपण तुलना करावयास बसलों म्हणजे इंग्लिश समाज, जर्मन समाज हे डोळ्यांपुढे ठेवून हिंदुसमाजाचा विचार करतों. हिंदुसमाज व येथून पुढे भारती समाज तितका संघटित व पराक्रमी व्हावा ही आपली आकांक्षा असल्यामुळे त्या दृष्टीने ही तुलना करण्यास हरकत नाहीं. नव्हे, ती अवश्य आहे; पण आतांपर्यंत झालेल्या विशेषत: इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत झालेल्या- कार्याची चिकित्सा करतांना अशी तुलना करणे केव्हांहि युक्त होणार नाहीं. कारण इंग्लिश किंवा जर्मन समाज यांचा जीव अगदी लहान, आणि त्यांच्यांतील भेद फारच कमी. तेथे राष्ट्ररूपानें संघटित झालेले बहुतेक लोक एकधर्मी, एकभाषी, आणि विशेष म्हणजे जवळजवळ एकवंशी आहेत. तांत्रिकरीत्या त्यांच्यांत वंशभेद असला तरी अगदीं गोरे व अगदीं काळे, उंच नाकाचे व बसक्या नाकाचे, अत्यंत सुरेख व अत्यंत कुरूप, अत्यंत सुसंस्कृत व अत्यंत रानटी अशी भिन्नता त्यांच्यांत नव्हती; यामुळे इंग्लंड, जर्मनी या देशांत त्यांची संघटना झाली ही नवलाची गोष्ट नसून तितकी बलिष्ठ संघटना स्पेन, इटली, पोलंड व मध्य युरोपांतील देश, येथें होऊ शकली नाहीं, ही नवलाची गोष्ट आहे. तेव्हां अशी तुलना करून हिंदुसमाजाकडे पाहणे