पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८३
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

जमाती येऊन स्थायिक झालेल्या आहेत. येथल्या अगदी मूळच्या रहिवाशांना आज आदिवासी किंवा आदिद्रवीड असें म्हणतात. त्यांचा संसार येथे चालू असतांना द्रवीड लोक येथे आले व त्यांच्यामागून आज ज्यांचा विशेष बोलाबाला आहे ते आर्य लोक आले. हा ठोकळ हिशेब झाला. पण या भूमीच्या चित्रपटाकडे पाहिले तर येथे वरच्याशिवाय आणखी असुर, दास, यवन, चीन, शबर, किरात, पुलिंद, बर्बर, यक्ष, गंधर्व, किन्नर, विद्याधर, वानर इ जमाती वेदकाळीं होत्या असे दिसतें. आणि आजचें संशोधन असें सागते की, त्यांच्यापैकी कांहीं जमाती आर्याइतक्याच सुधारलेल्या होत्या, तर कांहीं अगदी रानटी होत्या. यानंतर ऐतिहासिक काळाकडे पाहिलें तर शक, युएची, कुशान, हूण, मग, ग्रीक अशा अनेक जमाती, लाखांच्या संख्येने येथे येऊन शेकडो वर्षे स्थिर झालेल्या दिसतात. शिकंदराच्या काळापासून हर्षाच्या काळापर्यंत या जमातींची नऊ आक्रमणें भरतभूमीवर झालीं व तेवढीं सर्व येथील वीरपुरुषांनी मारून काढून या भूमीचें स्वास्थ्य अबाधित राखिलें, यानन्तर अर्वाचीन काळांत प्रथम मुसलमानांची आक्रमणे सुरू झालीं. हे येथे येणारे मुसलमानहि असेच भिन्न वंश, भिन्न परंपरा, भिन्न संस्कृति, भिन्न पंथ यामुळे परस्परांपासून विलग होते. अरब, तुर्क, मोंगल, इराणी, अफगाण असे अनेक वंश, शिया, सुनी, सूफी असे अनेक पंथ या प्रकारचे त्यांच्यांतहि अनेक भेद होते. त्यांचा सहाशे सातशे वर्षे सहवास व राज्य येथे झाल्यामुळे मूळच्या भारती समाजाच्या वैचित्र्यांत व त्यामुळे येथील गुंतागुंतींत आणखी भर पडली. या मुसलमानांच्या नंतर पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज हे लोक येथे आले आणि विजेते म्हणून शेकडों वर्षे येथें स्थायिक झाले.
 अशा या शेकडों जमातींचा एकजीव करून त्यांच्यांतून एक समाज निर्माण करणे हें कार्य किती कठीण, किती दुःसाध्य आहे, याची कोणालाहि सहज कल्पना येईल. आणि ज्यांना येणार नाहीं त्यांनीं, अशा तऱ्हेच्या अनंत भिन्न जमाती ज्या भूभागांत एकत्र येऊन वसलेल्या आहेत, अशा भूभागांकडे दृष्टि टाकावी व तेथील नेत्यांना हें कार्य कितपत साधले याचा विचार करावा.