पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८२
भारतीय लोकसत्ता

भीति, एका अस्पृष्टाकडेच नवी घटना तयार करण्याचे काम देण्यांत आलें हें पाहून कमी झाली असेल असें वाटतें. डॉ. आंबेडकरांचें मात्र त्यांनी स्वतःच ती घटना तयार केली असूनहि, समाधान झालेले नाहीं असे दिसतें. मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, काँग्रेसनें अस्पृश्यांसाठी कांहींहि केलेले नाहीं, हे प्रतिपादन ते करीतच राहिले आहेत. आणि आतां तर आपण केलेली घटना जाळून टाकण्याच्या लायकीची आहे असे ते सांगू लागले आहेत. पण स्वत: नव्या समाजरचनेचे नियम केल्यानंतरहि ते असें म्हणत राहिले तर त्यांचें समाधान कोणी कधीं करूं शकेल असे वाटत नाहीं. पण सुदैवाने एकंदर अस्पृश्य समाज अशा मनःस्थितींत राहिला आहे असे वाटत नाहीं. काँग्रेसच्या आतांपर्यंतच्या सेवेमुळे व या शेवटच्या कृतीमुळे अस्पृश्यांच्या मनांतली भीति नष्ट झाली असून त्यांचा काँग्रेसवरचा व सवर्णीयांवरचा विश्वास बराचसा वाढला असावा असें, गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला जो एकमुखी पाठिंबा दिला त्यावरून, म्हणावेसे वाटते. सवर्णीयांवरचा विश्वास वाढला नसला तरी, निदान आतां येथून पुढे स्वराज्यांत आपल्या सर्व प्रकारच्या गुणांना व कर्तृत्वाला जास्त अवसर मिळेल इतकें त्यांना वाटू लागले असले तरी जुनें युग काँग्रेसनें पालटले असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं.
 स्पृश्य व अस्पृश्य हीं हिंदुस्थानचीं दोन शकले सांधून देण्याचें महाकार्य काँग्रेसने केले आहे. आतां हीं शकले एकजीव होऊन हा समाज अभंग होऊन जाणे, हे केवळ कालावधीचे काम आहे. अर्थात् तेहि सोपे आहे असें नाहीं. त्यासाठी दोन्ही समाजांना फार मोठीं पथ्ये पाळावी लागतील, फार विवेकानें व संयमाने॑ वागावें लागेल; पण हे घडून येईल अशी आशा वाटते.
 अस्पृश्य समाजाविषयींचें बहुतेक विवेचन येथे संपले. आणखी कांहीं विचार सांगावयाचे आहेत. पण आदिवासी व अस्पृश्य या दोघांनाहि ते साधारण असल्यामुळे प्रथम आतां आदिवासी समाजाविषयीं विवेचन करावयाचे आहे.

आदिवासी

 भरतभूमीत प्राचीन काळापासून आजपर्यंत भिन्न वर्णांच्या, भिन्न रक्तांच्या, भिन्न धर्मांच्या, भिन्न परंपरांच्या, भिन्न संस्कृतींच्या शेकडों