पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८१
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

मापानें आपल्या पुस्तकांत त्यांनी गांधी, वल्लभभाई यांना मोजले आहे. महात्माजींबद्दल तर ते अत्यंत कडवटपर्णे लिहितात. आणि या सर्वांला प्रधान कारण एकच कीं अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला महात्माजींनीं विरोध केला. वास्तविक डॉ. आंबेडकरांचेंहि मत एकदां मिश्र मतदारसंघाला अनुकूल होते. पुढे त्यांचे मत बदललें. पण तेवढयामुळे महात्माजींना त्यांनीं शत्रु लेखावें हें सयुक्तिक वाटत नाहीं. पण हा वाद आतां जुना झाला आहे. आणि त्यांतील कडवटपणा अस्पृश्यांच्या मनांत शिल्लक असला तरी त्याचा जोर कमी झाला असल्यामुळे त्याचा फारसा विचार करण्याचे कारण नाहीं.

आजचे मनु- डॉ. आंबेडकर

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अस्पृश्यता निवारणाच्या दृष्टीने काँग्रेसनें एक महत्कृत्य केले. डॉ. आंबेडकरांनाच पंडित नेहरूंनी भारताची घटना तयार करण्याचे काम सांगितलें. हे सांगतांना पंडितजींनी जणूं अशीच भूमिका घेतली होती: 'यापूर्वी आम्हीं सवर्णीयांनी समाजरचनेचे सिद्धांत ठरविले, नियम केले व त्याच्या आधारे तुमच्यावर घोर अन्याय केला, आतां त्याचे परिमार्जन करण्याची संधि आम्हांला आली आहे. ती आम्ही घेत. आतां समाजरचनेचे सिद्धांत तुम्ही ठरवा, नियम तुम्ही करा. आम्ही नियम केले, आणि ते तुम्हांला उत्कर्षकारक व सुखप्रद असे असले तरी त्यांत संशयाला जागा राहील, तेव्हां नवी समाजरचना तुम्हीच करा. त्या चौकटींत बसण्यास आम्ही तयार आहोत.' स्पृश्य समाज, त्यांतहि ब्राह्मण व त्यांतहि स्मृतिकार मनु यांवर आंबेडकरांचा भयंकर कटाक्ष आहे. तेव्हां त्याच स्पृश्य समाजाने मूर्धस्थानी अधिष्ठित केलेले ब्राह्मण महामंत्री नेहरू यांनी नव्या काळच्या मनूचेंच कार्य करावयास एका थोर अस्पृश्य पंडिताला विनंति करावी हे नव्या काळाला सर्वथैव उचित असे झाले आहे. या कृत्याने काँग्रेसनें युगायुगांचीं घोर पापें तत्त्वतः तरी धुवून टाकलीं आहेत. यासाठी तिला द्यावें तितके धन्यवाद थोडेच आहेत.
 स्वातंत्र्य प्राप्त होतांच येथें पुन्हां ब्राह्मणी राज्य सुरू होईल आणि अस्पृश्यांचा पूर्वीसारखाच छळ सवर्णीय करूं लागतील ही त्यांच्या मनांतील