पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८०
भारतीय लोकसत्ता

व स्पृश्यांवर केली असती तर ती सयुक्तिकच होती. पण तेवढ्यानें भागले नाहीं. डॉ. आंबेडकर, मद्रासकडचे भाग्यारेड्डी व इतरहि अनेक अस्पृश्य पुढारी यांनीं, काँग्रेसनें व स्पृश्य समाजानें या बाबतीत कांहींच हालचाल केली नाहीं, असें प्रतिपादन करण्यास सुरवात केली. वर सांगितलेले जे प्रयत्न, त्यांचें त्यांना मुळींच महत्त्व वाटेनासे झाले, इतकेंच नव्हे तर, अस्पृश्य समाजाला मागल्याप्रमाणेच गुलामगिरीच्या अवस्थेत डांबून टाकण्याचे काँग्रेसचें, महात्माजींचे व एकंदर स्पृश्य समाजाचे धोरण आहे, असे ते म्हणूं लागले. १९३१ साली गोलमेज परिषदेत व त्यानिमित्तानें हिंदुस्थानांतहि श्रीनिवास, रा. ब. राजा, एम् व्ही. भाग्यारेड्डी, डॉ. आंबेडकर प्रभृति अस्पृश्य पुढाऱ्यांचीं जीं भाषणे झाली त्या सर्वांचा हाच सूर होता. १९३१ सालापर्यंत अस्पृश्यांनी असा अविश्वास दर्शविला यांतहि एकवेळ नवल वाटण्याजोगे कांहीं नाहीं. कारण प्रत्यक्ष प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनें दृश्य अशी प्रगति त्यावेळपर्यंत थोडीच झाली होती. पण १९३७ साली काँग्रेसच्या हाती सत्ता आल्यानंतर तिनें या बाबतीत कायदे करून खरोखर फार मोठी प्रगति केली. तेवढ्यावरून स्पृश्यांच्या हाती सत्ता गेली तर येथे पुन्हां ब्राह्मणी राज्य सुरू होईल, पुन्हां चातुर्वर्ण्याची प्रस्थापना होईल, पुन्हां अस्पृश्यतेचे नियम कडक होतील ही अस्पृश्यांच्या मनांतली भीति नाहींशी व्हावयास हवी होती, पण आश्चर्य असे की १९४५ सालीं डॉ. आंबेडकरांनी 'व्हॉट काँग्रेस ॲंड गांधी हॅव डन् टु दि अनटचेबल्स्' हे पुस्तक लिहून काँग्रेसवर पुन्हां ब्राह्मणी राज्याचे आरोप पहिल्यापेक्षा जास्त कटुतेने व त्वेषानें केले आहेत. आणि त्यानंतर १९४८ सालीं स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर नवी घटना स्वतः घडवीत असतांनाहि 'हू वेअर दि अनूटचेबल्स्' हे पुस्तक लिहून त्याच्या प्रस्तावनेंत तेंच मत प्रतिपादिलें आहे. 'आज सर्व पांडित्य, सर्व विद्याध्ययन ब्राह्मणवर्गांतच आहे व अस्पृश्यता व एकंदर विषमता कायम ठेवण्यात त्यांचा स्वार्थ असल्यामुळे तो वर्ग अस्पृश्यतानिवारणास व एकंदर क्रान्तिकारक विचार स्वीकारण्यास कधींच तयार होणार नाहीं.' असें या प्रस्तावनेंत त्यांनी म्हटले आहे. अर्थात् येथे केवळ ब्राह्मणांविरुद्ध कटाक्ष असला तरी आंबेडकरांचा दंश सर्वच सवर्ण हिंदूवर आहे. नेहरू, टिळक, परांजपे यांच्याच