पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७९
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

आहेत. सर्व प्रांत मिळून अस्पृश्यांसाठी १२० वसतिगृह चालविलीं आहेत. औद्योगिक शाळा चालवून अस्पृश्यांना वीणकाम, सुतारी, लोहारी, शिवणकाम, चर्मकाम, पुस्तकवांधणी इ. व्यावसायिक शिक्षण देण्याची सोय केली आहे. मंदिरें, रस्ते, पाणवठे खुले करणे यासाठी संघाचे सारखे प्रयत्न चालू असत. सारांश या दलित समाजाच्या उन्नतीचा जो जो मार्ग दिसला तो या संघानें चोखाळला आहे. १९३७ साली काँग्रेस सत्तारूढ होतांच तिनें वरील सर्व गोष्टी कायद्यानेंच घडवून आणल्या. शिवाय अस्पृश्यांसाठी सहकारी संस्था काढल्या. पडीत जमिनी त्यांना लागवडीस दिल्या. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जागांपासून मंत्र्यांच्या जागांपर्यंत सर्व प्रकारच्या अधिकारांच्या जागा त्यांना देऊन त्यांच्या कर्तृत्वाला वाव करून दिला.

अस्पृश्यांच्या नेत्यांच्या दृष्टीनें

 अशा रीतीनें गेल्या शंभर वर्षात अस्पृश्यता नष्ट करून हिंदु समाजापासून अलग राहिलेला पांचसहा कोटींचा एक प्रचंड मानवसमूह त्याला जोडून टाकण्याचे जे प्रयत्न झाले ते युगपरिवर्तनाच्या दृष्टीनें बरेच समाधानकारक आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. मतपरिवर्तन, प्रत्यक्ष आचार, शिक्षणाचा प्रसार, राजकीय जागृति व कायदा इ. यावच्छक्य मार्गानें स्पृश्य समाजानें व विशेषतः काँग्रेस आणि महात्माजी यांनी ही दुष्ट रूढी नाहींशी करण्याचे प्रयत्न केले व त्यानंतर स्पृश्य व अस्पृश्य हे समाज एकजीव होऊन जाणे हा केवळ कालावधीचा प्रश्न आहे असे सर्वत्र दिसू लागले. पण याच सुमारास वर सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यांत डॉ. आंबेडकरांसारखे थोर नेते निर्माण झाले व अस्पृश्यांच्या या नेत्यांना तेव्हांपर्यंत झालेल्या कार्यामुळे मुळींच समाधान झाले नाहीं. आणि तें अगदी साहजिक होतें. अस्पृश्यांच्या रोजच्या जीवनांतील दुःखे व यातना इतक्या असह्य आहेत आणि थोडीशी जागृति आल्यानंतर त्या त्या यातनांची व स्पृश्यांकडून होणाऱ्या अवमानाची जाणीव इतकी भयंकर असते कीं, केवळ जुन्या युगाची दिशा बदलली एवढ्यामुळे त्या समाजाला एकदम समाधान वाटेल अशी आशा धरणे वेडेपणाचें ठरेल. आणि त्या दृष्टीनें, म्हणजे काम फार मंदगतीने चालले आहे अशा अर्थाची टीका अस्पृश्य नेत्यांनी काँग्रेसवर