पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७८
भारतीय लोकसत्ता

टाकला. सर्व समाज कांहीं एका उदात्त ध्येयानें प्रेरित होऊन जेव्हां कार्याला लागतो त्यावेळी समाजांतल्या सर्वच प्रगतिकारक चळवळींना तेज प्राप्त होते आणि स्वातंत्र्याचा लढा हें अशा ध्येयांपैकी सर्वात श्रेष्ठ असे ध्येय आहे. धर्म, जाति, पंथ यांनी निर्माण झालेले क्षुद्र भेद या महान् यज्ञाच्या अग्नीनें वितळून जातात. स्वातंत्र्याच्या लढ्यांतूनच वांशिक, जातीय व धार्मिक भेद नष्ट होऊन इंग्लंड, जर्मनी, इटली, तुर्कस्थान, जपान, चीन इ. राष्ट्र निर्माण झालीं, हें इतिहासानें दाखविले आहे. भरतभूमीत १९२० ते १९४७ या काळांत हेंच घडून आले. अस्पृश्यता हा अन्याय आहे, तो हिंदुधर्मावरील कलंक आहे हा विचार गेल्या शंभर वर्षांत रूढ होऊन त्याअन्वयें वर निर्देशिलेली कार्ये सुरू झाली होतीं; पण मानवाचा स्वभावच असा आहे की केवळ सत्याच्या ज्ञानामुळे तो एकदम जागचा हलत नाहीं. अन्यायाच्या केवळ बौद्धिक जाणीवेमुळे तो परिवर्तनाला सिद्ध होत नाहीं; पण मरणमारणाच्या संग्रामांत उतरल्यानंतर तो सर्व क्षेत्रांत एकदम क्रांतीला सिद्ध होतो. जुनीं तत्त्वज्ञाने उध्वस्त करून टाकण्यास एरवीं त्याचें मन कचरते; पण या संग्रामाच्या प्रेरणेने त्याच्या उदात्त वृत्ति जागृत होतात आणि मग तो क्षुद्र भेदभाव विसरण्यास सिद्ध होतो. १९२० नंतरच्या वीस पंचवीस वर्षांच्या काळांत अस्पृश्यतानिवारणाचें कार्य अत्यंत वेगानें होऊन आज अखिल भारतीय समाजाने आपल्या जीवनाच्या मूळ घटनेंतूनच अस्पृश्यता काढून टाकली आहे. याचे कारण, महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या लढ्यांत अस्पृश्यतानिवारण हें एक अवश्य कलम करून टाकले हे आहे. त्या उदात्त ध्येयाशी ही कल्पना निगडित होतांच भारतीयांनीं ती मनोभावानें स्वीकारली आणि ती विषमता, तो अन्याय, तें लांछन नष्ट करून टाकण्याच्या कामीं यश मिळविलें.
 या कालांत अस्पृश्यता निवारणाच्या कार्यास केवढी उठावणी मिळाली याचे केवळ दिग्दर्शन केले तरी त्यावरून पूर्ण कल्पना येईल. शाळा, रस्ते, विहिरी, पाणवठे या ठिकाणी अस्पृश्यांना स्पृश्यांनी खुला प्रवेश दिला, एवढेच नव्हे तर मदुरेच्या मीनाक्षीसारखी शेकडों पुरातन देवालये त्यांच्यासाठी खुली केलीं. एकट्या हरिजनसेवकसंघाचे कार्य पाहिले तरी हिंदूंच्या पालटलेल्या वृत्तीचें प्रत्यंतर येईल. या संघाने शेकडों शाळा काढल्या