पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७७
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

अशा रीतीनें जमून चर्चा व विचारविनिमय करण्याचा पायंडा कांबळे यांनी घालून दिला म्हणून या सभेचे महत्त्व विशेष आहे. येथून पुढे अस्पृश्य वर्गात खूपच चळवळी झाल्या आणि १९२० च्या नंतरच्या काळांत रा. ब. राजा, श्रीनिवासन, डॉ. आंबेडकर असे त्या जातींतच थोर नेते निर्माण होऊन अस्पृश्योद्धाराचें कार्य झपाट्यानें प्रगत होऊं लागले.

नवें चैतन्य

 १९२० ते २२ या कालांत जी असहकारितेची चळवळ झाली, तिच्यामुळे या देशांत एक नवीन युग निर्माण झालें. सामाजिक सुधारणा व राजकीय सुधारणा यांचे प्रवाह या काळापर्यंत भिन्न पात्रांतून चालले होते व त्यांच्या गति एकमेकींस कांहींशा विरोधी होत्या. तो विरोध आतां नाहींसा झाला. महात्मा गांधी यांनीं आर्थिक उन्नति, अस्पृश्यतानिवारण, हिंदुमुसलमानांचें ऐक्य इ. भिन्न क्षेत्रांतल्या सुधारणांचे धागे स्वातंत्र्याच्या लढ्यांत गुंतवून दिल्यामुळे या सर्व चळवळींना एक नवें तेज व चैतन्य प्राप्त झाले आणि त्यांचें कार्य अत्यंत वेगाने सुरू झाले. आतांपर्यंतच्या सर्वच चळवळी, सर्व संघटना व तज्जन्य जागृति ही सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या कक्षेपर्यंतच मर्यादित राहिलेली होती. आतां याच मध्यमवर्गीय तरुणांनी महात्मा गांधींचा संदेश खेडोपाडी नेऊन पोचविण्याचे कार्य आरंभिल्यामुळे सुधारणांचे लोण बहुजनसमाजापर्यंत पोचले आणि भारताचा हा पुराण पुरुष जागा होण्याची चिन्हे दिसू लागलीं. पूर्वीच्या पाऊणशे वर्षात ब्राह्मसमाज, प्रार्थनासमान, सत्यशोधक समाज, आर्यसमाज, राममोहन रॉय, लोकहितवादी, महात्मा फुले, रानडे, आगरकर, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांच्या प्रतिपादनामुळे हिंदुसमाजांत रूढ झालेले जुने घातकी तत्त्वज्ञान जवळ जवळ उच्छिन्न झाले होते आणि समता, स्वातंत्र्य, व्यक्तित्व, धर्मपरिवर्तन, बुद्धिप्रामाण्य या महनीय तत्त्वांनीं विभूषित असें सामाजिक पुनर्घटनेचें नवें तत्त्वज्ञान मूळ धरूं लागले होते. महात्मा गांधींचा व काँग्रेसचा राजकीय संग्रामाचा संदेश घेऊन हिंदुस्थानच्या खेड्यांत संचारार्थ गेलेले हजारो तरुण या नव्या तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी विचाराने व आचाराने अस्पृश्यतेला या काळांत अक्षरशः सुरुंग लावला आणि या पुरातन संस्थेचा पाया निखळून