पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७६
भारतीय लोकसत्ता

 महात्मा फुले यांच्यासारखाच आचारानें अस्पृश्यता नष्ट करण्याचा दुसरा उपक्रम बंगालमधील शशिपाद बंदोपाध्याय यांनी केला. १८६६ साली त्यांनी ब्राह्मपंथाचा स्वीकार केला. व तेव्हांपासून ते अस्पृश्यांत सर्सहा मिसळून जेऊं खाऊं लागले. या वर्गात शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनीं शाळा काढल्या व वर्तमानपत्र चालविले. ते स्वत: त्यांच्यांत जाऊन कीर्तन करीत व त्यांनाहि कीर्तने करावयास शिकवीत. आरोग्य, स्वच्छता, मद्यपानबंदी या सुधारणा त्यांनी तेथील चांडालवर्गात घडवून आणल्या. इकडे महाराष्ट्रांत महात्मा फुले यांच्यानंतर महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी या क्षेत्रांत फार मोठे कार्य केले. त्यांनी आपले सर्व आयुष्यच या कार्याला वाहून टाकले होते. १९०६ सालीं 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था त्यांनी स्थापन केली आणि पुढील पंचवीसतीस वर्षात सर्व हिंदुस्थानभर तिच्या शाखा काढून अस्पृश्यांना शिक्षण देणें, त्यांच्यासाठी वसतिगृहे चालविणे, स्पृश्य हिंदूंत मतपरिवर्तन घडवून आणणे, अस्पृश्यांत राजकीय जागृति व संघटना घडविणे इ. अनेक मार्गांनी त्यांनी हे कार्य चालविले होतें. याशिवाय हिंदुस्थानांतील अनेक संस्थानिकांनी आणि त्यांतल्या त्यांत श्रीमंत सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहू छत्रपति व म्हैसूरचे महाराज यांनी या अस्पृश्यतानिवारणाच्या कामीं बहुमोल कार्य केले आहे. हाती सत्ता असल्यामुळे यांनी शिक्षणप्रसार तर केलाच, पण त्याशिवाय आपल्या संस्थानांत त्यांनीं अस्पृश्यांना अधिकाराच्या जागा देणे, त्यांना वैदिक पद्धतीनें संस्कृत धर्मग्रंथांतून शिक्षण देणे, सर्व खात्यांतून व खुद्द राजवाड्यांतहि अस्पृश्यांना खुला संचार देणे व त्यांच्यासह भोजन करणे इ. मार्गांनींहि सुधारणा घडवून विषमतेचा हा रोग नष्ट करण्याचा फार जोराचा प्रयत्न केला.
 साधारण १९०० सालापासून अस्पृश्य वर्गात जागृति होऊन त्या वर्गातून त्यांचे स्वतःचे नेते व कार्यकर्ते निर्माण होऊं लागले. त्यांमध्ये शिवराम जानबा कांबळे यांचा प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे, यांनी १९०३ साली सासवड येथें अस्पृश्यांची एक मोठी सभा भरविली व दीड हजार अस्पृश्यांच्या सह्या घेऊन सरकारकडे त्यांना लष्करांत व पोलिसखात्यांत नोकऱ्या द्याव्या असा अर्ज केला. स्वजातीच्या उत्कर्षासाठी