पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७५
सामाजिक पुनर्घटना- अस्पृश्य व आदिवासी

आपली समाजरचनेचीं सर्व तत्त्वें अगदीं निखालस चुकीची असून ती नष्ट केल्यावांचून आपल्या समाजाची उन्नति होणार नाहीं. चातुवर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता हीं तत्त्व विषमतामूलक असून त्यामुळे जन्मावरून मनुष्याची योग्यता ठरविण्याचें घातक तत्त्व आपण रूढ करून ठेविले आहे. त्याचा त्याग करून, समतेच्या पायावर आपल्या समाजाची पुनर्रचना केल्यावांचून आपण समर्थ व बलशाली होणार नाहीं. राजा राममोहन रॉय यांच्यापासून आजच्या धर्मनिर्णयमंडळापर्यंत शेकडो सुधारकांनी भारती समाजाच्या बुडाशी असलेले विषमतेचें तत्त्वज्ञान नष्ट करून त्या जागी नवें तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्याचे प्रयत्न कसकसे केले हें मागल्या प्रकरणांत व त्याच्या आधींच्याहि प्रकरणांत सविस्तर सांगितले आहे. आज आतां अस्पृश्यता- निवारणाच्या क्षेत्रांत प्रत्यक्ष कार्य काय झाले त्याचा आढावा घ्यावयाचा आहे.

महात्मा फुले

 याविषयींच्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत राजा राममोहन, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी इ. सुधारक हे अग्रभागी असले तरी प्रत्यक्ष व्यवहाराच्या क्षेत्रांत अग्रपूजेचा मान महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. तत्वज्ञानाची महती कितीहि असली तरी प्रत्यक्ष कृतीवांचून ते सर्व तत्त्वज्ञान फोल ठरतें. ती कृति-प्रत्यक्ष आचारानें अस्पृश्यता नष्ट करण्याचे कार्य- या थोर पुरुषानें केली. १८५१ सालीं त्यांनी पुण्यास अस्पृश्यांसाठी पहिली शाळा उघडली. त्यासाठी त्यांच्यावर भयंकर गहजब झाला. त्यांना आपल्या पित्याचें घरहि सोडावे लागले. त्यांच्या पत्नीचा छळ झाला; पण त्यांनी आपले धैर्य सोडलें नाहीं. अस्पृश्य हाहि आपल्यासारखाच मानव आहे, हा समतेचा विचार हिंदुसमाजांत प्रसृत करून टाकण्याचा त्यांचा निर्धार रतिमात्र ढळला नाहीं. पुढे तर त्यांनी आपल्या घरांतला हौद अस्पृश्यांना खुला करून आणखी एक पाऊल टाकले. महात्मा फुले यांनी दहाबारा वर्षे अस्पृश्यांसाठी शाळा चालवून, त्यांच्यांत मिसळून, त्यांच्याबरोबर अन्न-पाण्याचा व्यवहार करून हिंदुधर्मावर असलेला हा कलंक नष्ट करण्याचा जो अत्यंत धडाडीने प्रयत्न केला त्यासाठी अखिल महाराष्ट्रच नव्हे, तर सर्व हिंदुस्थान त्यांचा ऋणी राहील.