पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७४
भारतीय लोकसत्ता

प्रांत, वर्ग इ. जेवढीं म्हणून भेदकारण अस्तित्वांत असू शकतात, ती सर्व आपल्या या भूमीत जारी आहेत आणि त्यामुळे हा भारती समाज भेदजर्जर व म्हणून दुबळा होऊन गेलेला आहे. या अनेक भेदांपैकी तीन प्रमुख भेदांचा विचार करण्याचें आपण ठरविलें होतें. ब्राह्मणब्राह्मणेतर, स्पृश्यअस्पृश्य व हिंदुमुसलमान हे ते भेद होत. यापैकी पहिल्या प्रश्नाचा विचार करून झाला. आतां अस्पृश्य व आदिवासी यांच्या प्रश्नांचा विचार करावयाचा आहे.
 या दोन समाजांची नुसती लोकसंख्या पाहिली तरी हा प्रश्न केवढा प्रचंड व किती बिकट आहे याची कल्पना येईल. हिंदुस्थानांत एकंदर अस्पृश्यांची लोकसंख्या पांच ते सहा कोटीपर्यंत आहे आणि नाग, भिल्ल, गोंड, संताळ इ. आदिवासी लोकांची संख्या दोन ते तीन कोटी आहे. १९५१ च्या गणतीप्रमाणे भारताची लोकसंख्या ३५ कोटी ६८ लक्ष आहे. यावरून असे ध्यानांत येईल की, भारताच्या एकंदर लोकसंख्येपैकी एकचतुर्थांश लोक असे आहेत की ज्यांचा सुसंस्कृत जीवनाच्या प्राथमिक अवस्थेशीहि अजून परिचय झालेला नाहीं. आज हजारों वर्षे हे कोट्यवधि लोक हिंदुसमाजाच्या सरहद्दीच्या आसपास रहात आहेत; पण त्यांना आपल्यांत घेऊन आत्मसात् करून सर्व मिळून एक अभंग हिंदुसमाज करून टाकण्यांत येथील नेत्यांना यश आलेले नाहीं. पूर्वीच्या समाजधुरीणांनी या बाबतींत काय प्रयत्न केले हे पाहणें केवळ ऐतिहासिक दृष्टीनेंच नव्हे तर आजचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेंहि उद्बोधक होईल. तसा थोडासा प्रयत्न पुढे करावयाचाहि आहे; पण आपण एवढे मनांत निश्चित ठेविले पाहिजे की, हे आठनऊ कोटी लोक त्यांच्यावर अनंत प्रकारचे संस्कार होऊन नागरिक या पदवीप्रत येईपर्यंत आपल्या लोकसत्तेला व्यवहारांत कसलाहि अर्थ निर्माण होणार नाही. त्यांना त्या पदवीला आणून पोचविण्यासाठी अर्वाचीन काळांत पूर्वसूरींनीं व काँग्रेसच्या नेत्यांनी कोणचे प्रयत्न केले याचा प्रथम आपण आढावा घेऊ व नंतर पुढील विवेचन करूं.
 ब्रिटिशांचे राज्य या देशांत प्रस्थापित झाल्यानंतर या देशांत थोर पुरुषांची जी पाहेली पिढी निर्माण झाली तिच्या असें ध्यानांत आले कीं,