पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७२
भारतीय लोकसत्ता

यांच्यासारखें अर्थकोविदत्व, आणि गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, इतिहास- संशोधन इ. क्षेत्रांतील पारंगतता प्राप्त करून घेऊन, राष्ट्रीय प्रपंचाच्या या सांस्कृतिक क्षेत्रांतहि त्यांना प्रगति करतां आली नाहीं. ब्राह्मणेतरांतील जे मराठेतर वर्ग, त्यांतले लोक पूर्वकाळांतहि या क्षेत्रांत अग्रभाग फार थोडे आले होते. त्यामुळे त्यांनी अर्वाचीन काळीं या क्षेत्रांत अजून पाऊल टाकले नसले तर त्यांत एवढेसे आश्चर्य नाहीं. पण मराठा समाजाचा मागासलेपणा हा अगदीं असमर्थनीय आहे. चाफेकर, सावरकर, बापट, कान्हेरे यांचा मार्ग त्यांना ब्रिटिश साम्राज्यावरील निष्ठेमुळे मान्य नसणे हे ठीक होतें. पण आय्. सी. एस्. चा मार्गहि त्यांनी अनुसरला नाहीं ! तो त्यांनी अनुसरला असता तर पाश्चात्य विद्येची उपासना त्यांना घडली असती. आणि मग, त्याच क्षेत्रांत नव्हे तर राष्ट्रीय प्रपंचाच्या सर्वच क्षेत्रांत ते अग्रमालिकेत येऊन उभे राहिले असते.
 सुदैवानें १९३०-३५ सालापासून अखिल ब्राह्मणेतर वर्ग हा राष्ट्राच्या मरणमारणाच्या संग्रामांत उतरला आहे. आपला उद्धार इंग्रज करतील, ही परावलंबनाची भाषा त्याने तेव्हांपासून सोडली आहे. पाश्चात्य विद्येची महतीहि आतां त्यानें जाणली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांसारखे थोर कार्यकर्ते ब्राह्मणेतरांत या विद्येचा आणि विशेषतः तिला आवश्यक असणाऱ्या तपोनिष्ठेचा प्रसार करण्यासाठी सर्वस्व अर्पण करीत आहेत. यामुळे त्या समाजाच्या कर्तृत्वाला बहर येईल व सर्व क्षेत्रांत तें फुलू लागेल, अशी निश्चित आशा वाटते.
 असो. या तऱ्हेने सर्व क्षेत्रांत कर्तृत्व बहरूं लागले म्हणजे बहुधा ब्राह्मणेतर समाज अत्यंत कठोर अशा आत्मनिरीक्षणास सिद्ध होईल. आणि मग स्वतःच्या समाजाला अत्यंत अवमानकारक अशी प्राचीन इतिहासाची मीमांसा टाकून देऊन त्या काळच्या श्रेयाप्रमाणेच अपश्रेयाचीहि भागीदारी तो स्वीकारील हें निश्चित. कारण अशी अपयशाची जबाबदारी टाळल्याने आपलाच अधःपात होतो, असे त्याच्या ध्यानांत येईल. असें झाले तर चालू इतिहासांतहि दर ठिकाणी भोळेपणाची भाबडेपणाची भूमिका घेऊन आपल्या अपयशाचें खापर दुसऱ्याच्या माथीं फोडण्याऐवजी आम्ही चुकलों, फसलों, घसरलों, तर त्याला आमचे आम्ही जबाबदार आहों,