पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७१
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

करण्याचे त्यांना कारण पडत नाहीं. म्हणून ते उदयास येत नाहींत. उलट अमेरिकेनें ब्रिटनची सत्ता दीडशे वर्षांपूर्वीच झुगारून देऊन आपल्या उत्कर्षाची, प्रगतीची, विकासाची व अंतिम संग्रामाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आणि ती घेतांच यक्षिणीची कांडी फिरावी तसा प्रकार होऊन तेथे सर्व प्रकारचे कर्तृत्व उफाळून वर आले.
 राष्ट्राच्या उत्कर्षाचे चिंतन सर्व प्रकारच्या कर्तृत्वाला प्रेरक होतें, हा सिद्धान्त मानवी समाजाबद्दल जे इतर अनेक सिद्धान्त प्रस्थापित झाले आहेत त्यांच्याइतका सत्य आहे. जड पदार्थाविषयींचे सिद्धान्त ज्याप्रमाणे शेकडां शंभर बरोबर ठरतात, त्याप्रमाणे समानशास्त्राचे सिद्धांत कधींच ठरत नाहींत. कारण मानवी मन हे जवळ जवळ अज्ञातच आहे. या मर्यादा ध्यानांत ठेवून वरील सिद्धांताचा वाचकांनी विचार केला तर त्याचा बराच प्रत्यय त्यांना येईल असे वाटतें.

अखिल राष्ट्राचें चिंतन

 माझ्या मतें मराठा समाज गेलीं शंभर वर्षे मागासलेला राहिला आहे त्याचें हें कारण आहे. राष्ट्राच्या उत्कर्षाचें चिंतन करण्याची प्रवृत्ति आपल्या देशांत अर्वाचीन काळांत तरी पाश्चात्य विद्येमुळे निर्माण झाली आहे. त्या पाश्चात्य विद्येची उपासना या प्राचीन काळच्या थोर व कर्तृत्वशाली समाजाने केली नाहीं. आणि ज्या थोड्या लोकांनी केली त्यांनी देशाच्या मरणमारणाच्या संग्रामांतून अलिप्त रहाण्याचे धोरण ठेविलें. त्यामुळे गेल्या शंभर वर्षात महात्माजी, सुभाषचन्द्र, योगी अरविंद, लजपतराय, पंडित जवाहरलाल, विवेकानंद, वल्लभभाई, रानडे, गोखले, टिळक, सावरकर, जगदीशचन्द्र, चंद्रशेखर रमण, रामानुजम् राधाकृष्णन्, रवींद्रनाथ यांच्याप्रमाणे सर्व क्षेत्रांत अखिल भारताचे नेतृत्व करणारे पुरुष त्या समाजांतून, त्यांच्या रक्तांत तें सामर्थ्य असूनहि, निर्माण झाले नाहींत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासांतहि डॉ. भाऊ दाजी, डॉ. भांडारकर, न्या. तेलंग, चिंतामणराव वैद्य यांसारखे संस्कृत पांडित्य, हरीभाऊ, देवल, खाडिलकर, गडकरी यांसारखी साहित्यप्रतिभा, शिवरामपन्त परांजपे, डॉ. जयकर यांसारखें वक्तृत्व, चिंतामणराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ