पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७०
भारतीय लोकसत्ता

इंग्लिश, फ्रेंच, डच, जर्मन हेच लोक कॅनडा, न्यूझीलंड, इ. देशांत आहेत. आणि तेच लोक अमेरिकेत आहेत. असे असतांना त्यांच्या चरित्रांत व कर्तृत्वांत एवढा फरक कां पडावा? याचें उत्तर माझ्या मतें एकच आहे. कॅनडा, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, व आस्ट्रेलिया येथील लोक आपल्या उत्कर्षासाठी, विशेषतः आपल्या संरक्षणासाठी, सर्वस्वी इंग्लंडवर अवलंबून आहेत. निदान आतांपर्यंत तरी होते. स्वतःच्या उत्कर्षाची व विशेषतः मरणमारणाच्या संग्रामाची जबाबदारी ते घेत नाहीत. या जबाबदारीचा अर्थ फार मोठा असतो. विज्ञान- संशोधन, शस्त्रास्त्राची तयारी, सर्व जगावर चौफेर सावध दृष्टि टाकीत रहाणे, संघटनेचें तत्वज्ञान सिद्ध ठेवून प्रसृत करणें, धर्म, नीति, यांची चिंता वाहणे या सर्वांचा अंतर्भाव यांत होतो. अशी ही राष्ट्राच्या मरण- मारणाच्या संग्रामाची जबाबदारी शिरावर घेऊन त्याची नित्य चिंता वाहणे ही कर्तृत्वाला चेतना देणारी अत्यंत श्रेष्ठ अशी प्रेरणा आहे. आपल्या राष्ट्राच्या उत्कर्षाची चिंता मनुष्य करूं लागला की त्याला स्वतःच्या गुणांचा उपयोग करण्याचे कारण व संधि निर्माण होते. ज्याला हा उत्कर्ष साधावयाचा नाहीं, त्याची ज्याला फिकीर नाहीं, त्याच्या अंगीं मोठे गुण असले तरी ते कुजून सडून जातात. केवळ दोन एकर जमीन नांगरून पोराबाळांचें पोट भरणे, किंवा जरूर तेवढे मासे पकडून निर्वाह करणे, किंवा असलेली वाडवडिलांची मिळकत संभाळून विलास करणे, किंवा कारकुनी करून गुजारा करणे यापलीकडे ज्यांची दृष्टि जातच नाहीं, त्यांना तो संसार संभाळण्यासाठी शास्त्रसंशोधन, साहित्यलेखन यासाठी लागणारे गुण अंगी असले तरी त्यांची जरूरच लागणार नाहीं, आणि म्हणून त्या गुणांना चालना मिळणार नाहीं ! राष्ट्राच्या उत्कर्षाची चिंता, मरणमारणाच्या संग्रामाची जबाबदारी व कर्तृत्व यांचा संबंध हा असा अगदी उघड दिसणारा आहे. त्यांत गूढ असें कांहीं नाहीं. न्यूझीलंड, कानडा इ. देशांनी राष्ट्रीय उत्कर्षांची जबाबदारी स्वतःच्या शिरावर कधींच घेतली नाहीं. आपल्यावर कोणी स्वारी केली तर ब्रिटन आपले रक्षण करील, या विचारानें ते निर्धास्त राहिलेले लोक आहेत. त्या लोकांच्या रक्तांत मोठे गुण, मोठे कर्तृत्व असले पाहिजे यांत शंका नाहीं. पण त्यांचा वापर