पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६९
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

राहिला आहे, आपले पूर्वकाळचे कर्तृत्व व पराक्रम त्याला प्रगट करता आला नाहीं, त्याचे कारण म्हणजे त्यानें पत्करलेली अत्यंत अवमानकारक अशी भूमिका हेंच होय. पूर्व इतिहासाची विपरीत मीमांसा करून सर्व अनर्थांची जबाबदारी ब्राह्मणांच्या माथीं लादण्यासाठी त्यानें महापराक्रमी क्षत्रियांना ब्राह्मणांच्या हाताखालचीं बाहुलीं ठरवून टाकले व त्यामुळेच ब्राह्मणी वर्चस्व मोडण्यास आपण असमर्थ आहों असें ठरवून, आपला उत्कर्ष इंग्रज करून देणार, ही मराठ्यांच्या क्षात्रतेजाला अत्यंत अवमानकारक अशी भूमिका त्यानें पत्करली. मराठा समाज हा मागासलेला राहिला त्याचें हें कारण आहे. याविषयीं थोडी शास्त्रीय चिकित्सा करून हें लांबलेले विवेचन संपवितो.

कर्तृत्वाची महाप्रेरणा

 कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका, या देशांकडे वाचकांनी जरा दृष्टिक्षेप करावा. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या युरोपांतल्या देशांतील अस्सल युरोपीय रक्ताच्या लोकांनींच वरील देश वसविलेले आहेत. तरी गेल्या शंभर दोनशे वर्षांत त्या देशांत (कादंबरी, काव्य, नाटक इ.) साहित्य, विज्ञान, घर्मसुधारणा, राजकीय नेतृत्व, तत्त्वज्ञान, रणपांडित्य, समाजसंघटना, इ. सांस्कृतिक क्षेत्रांत एकहि पुरुष शॉ, गालस्वर्दी, क्युरी, पाश्चर, न्यूटन, लूथर, लेनिन, स्टॅलिन, माओट्से टुंग, रसेल, मार्क्स, हिंडेनबर्ग, रोमेल, झुकॉव्ह, यांच्याइतका उंच गेलेला दिसत नाहीं. क्वचित् अपवाद कोठें असेल, पण एकंदरीने अशी थोर प्रतिभा, बुद्धिमत्ता व कर्तृत्व त्या देशांत दिसत नाहीं, हें खरें आहे. आणि याच लोकांनीं त्याच पद्धतीने वसविलेला अमेरिका हा देश पहातां तेथें सर्व प्रकारच्या कर्तृत्वास नुसते उधान आलेले दिसतें. वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन, रूझवेल्ट, एडिसन, कॉम्टन, ग्रॅहम बेल, लेक, मायकेनसन, राइटबंधु, विल् ड्युरँट्, जॉन ड्यूई, पर्ल बक्, अप्टन सिंक्लेअर, हेलन केलर, जेन ॲडम्स, हेन्री फोर्ड, लिंडबर्ग असे राजकारणी, शास्त्रसंशोधक, तत्त्ववेत्ते, साहित्यविशारद अमेरिकेंत होऊन गेले व प्रत्यहीं होत आहेत
 भा. लो.... २४