पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६८
भारतीय लोकसत्ता

मराठ्यांच्या अपयशाची मीमांसा ही, मागील अंकावरून पुढे चालू, अशापैकी आहे. फसविणारा कपटकारस्थानी ब्राह्मण आणि फसणारे भोळे भाबडे, अजाण, अश्राप मराठे! कंसश्रीकृष्ण, कौरवपांडव, रामरावण हे सर्वं महात्मा फुले यांच्या मतें देवभोळे क्षेत्रपति होते. त्यांना ब्राह्मणांनीं फसविलें, त्यांच्यांत दुही माजविली व त्यांचा नाश केला. सातारचे शेवटचे छत्रपति प्रतापसिंह यांचे बंधु आप्पासाहेब हे स्वतःच त्यांच्याविरुद्ध जाऊन इंग्रजांस सामील झाले. त्याविषयी लिहितांना काशीनाथराव देशमुख म्हणतात की 'हा भोळा मराठा वीर' सांगलीकर व नातू यांच्या कारस्थानास बळी पडला. प्रत्येक ठिकाणी क्षत्रिय-मराठा हा भोळा आहे भाबडा आहे, त्याला स्वतःची कणखर बुद्धि नाहीं, स्वयंप्रभ कर्तृत्व नाहीं. त्याला ब्राह्मणांनीं फसविले, त्याला मोगलांनी फसविलें, त्याला इंग्रजांनी फसविलें, त्याला गुजराथ्यांनी फसविले, आणि आतां पुन्हां त्याला, त्याच्या हातीं सर्व राजसत्ता, बहुमताचा पाठिंबा, महात्मा फुले व राजर्षि शाहू यांनी निर्माण केलेली जागृति, हे सर्व असूनहि, ब्राह्मण फसवीत आहेत! आणि हे भोळे मराठे वीर फसत आहेत! भगवान् श्रीकृष्णापासून काँग्रेसमधील मराठयांपर्यत हाच प्रकार चालू आहे !
 मला एक सुदैवाची गोष्ट अशी वाटते की भाऊसाहेब हिरे व यशवंतराव चव्हाण यांनी ही भूमिका पत्करलेली नाहीं. आपण फसलों, आपल्या मनासारखें आपल्याला घडवितां आले नाही, असे त्यांना कदाचित् वाटतहि असेल. पण सर्व साधने व उपकरणे हाताशी असतांना आपल्या अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर लादून आपण भोळेपणाची सबब सांगावी, ही भूमिका त्यांना अत्यंत अवमानकारक वाटत असावी. आपण उत्कर्ष पावलों तर आपले आपण; आणि खाली गेलों, अपयशी ठरलों, तरी आपले आपणच; एका श्रेयाप्रमाणे दुसऱ्या अपश्रेयाचीहि जबाबदारी माझ्या शिरावर आहे, याच भूमिकेत स्वाभिमान आहे, व भावीं उत्कर्षांची बीजे आहेत असें त्यांचें मत असावें असे त्यांच्या भाषणांवरून दिसते. हे खरे असेल व त्यांच्या नेतृत्वानें हीच भूमिका ब्राह्मणेतरांनी पत्करली असेल तर महाराष्ट्राचा भाग्योदय लवकर होण्याची आशा धरण्यास हरकत नाहीं. कारण माझे असें निश्चित मत आहे की गेली शंभर वर्षे मराठा समाज जो मागासलेला