पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६७
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

दिसेल. अशा वेळी आपला सर्व समाज समतावादी, उदार असून विषमतेच्या ब्राह्मणी धर्मातून मुक्त आहे, असा खोटा डांगोरा हा नेतृत्व करणारा समाज पिटीत राहील तर स्वतःच्या समाजाची व इतर समाजांची पुनर्घटना करण्यांत तो अयशस्वी होईल; आणि मग ब्राह्मणवर्गाला एकजात जलुमी व अन्यायी ठरविण्यासाठी त्यांनी इतिहासाची जशी मीमांसा केली आणि ती सत्य मानून परावलंबनाची भूमिका जशी त्यांनी स्वीकारली, तशीच मीमांसा व तशीच भूमिका हे नवीन वर येणारे समाज व जुने मराठेतर पत्करतील.

भोळेपणाची भूमिका

 आपण फसलों, अपयशी झालों, आपल्यांत फूट पडली, आपण विषमता प्रस्थापित केली व अन्याय केला तर ते सर्व कोणातरी दुसऱ्या कारस्थानी समाजाच्या कारवाईला बळी पडल्यामुळे होय, आपल्या समाजाच्या अंगी वास्तविक ते दोष मुळींच नाहीत, आपला समाज भोळा भाबडा, श्रद्धाळू असा आहे, कारस्थान, कपट, त्याला कळत नाहीं, अशी भूमिका अजूनहि ब्राम्हणेतरांनी सोडली नसावी असे वाटतें. मुंबई प्रदेशांत मंत्रिमंडळांमध्ये महाराष्ट्राच्या वांट्याला महत्त्वाची खाती आलेली नाहीत, प्रतिनिधींच्या प्रमाणांत त्यांना मंत्रीमंडळांत जागाहि मिळालेल्या नाहीत, मुंबईचें प्रतिनिधित्व करण्याचा त्यांचा हक्क लाथाडण्यांत आला, अशा तऱ्हेची टीका एकेकाळी वर्तमानपत्रांत चालू होती. या टीकेंत प्रामुख्याने असा एक सूर होता कीं मराठ्यांना- हिरे,चव्हाण, या त्यांच्या प्रतिनिधींना- गुजराथ्यांनीं फसविलें, बनविलें, आणि म्हणून ही अवस्था झालेली आहे. कोणाच्या मतें ही फसवणूक ब्राह्मणांनी केली आहे. यावेळी मुख्य प्रधान वास्तविक भाऊसाहेब हिरे व्हावयाचे. ते न होण्याची कारणमीमांसा एका मराठा पत्रांत पुढील- प्रमाणे दिलेली आहे. बाळासाहेब खेर यांना मुरारजीच मुख्य मंत्रि व्हावे असें वाटत होतें. हिरे त्यांना नको होते. म्हणून त्यांनी बनाव असा घडवून आणला कीं हिरे यांना मुरारजीकडे पाठवून 'आपणच मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे' असे हिरे यांचे तोंडून वदविलें. हिरे हे आपल्या योजनांच्या स्वप्नसृष्टीत दंग होते. त्यामुळे आपण कोणच्या कचाट्यांत सांपडलो आहों याचे त्यांना भान राहिले नाहीं. वगैरे. मुंबई विधिमंडळांतील