पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६६
भारतीय लोकसत्ता

करून टाकण्यास समर्थ ठरत असतांना मराठ्यांनी मात्र आपणांत हें सामर्थ्य नाहीं, अशी भूमिका स्वीकारावी आणि इंग्रजांच्या स्वार्थीपणाची हजारों प्रत्यंतरें येत असतांना, त्यांना आपले उद्धारकर्ते मानून तिलाच दृढपणे चिकटून रहावें हें या भूमीचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे केवढे दुर्दैव होय ! सुदैवानें १९३० सालापासून इंग्रजांच्या आश्रयानें आत्मोद्धार करण्याचे धोरण ब्राह्मणेतरांनी टाकले आहे. पण उच्चनीचतेच्या धर्माचे वर्चस्व सर्वच समाजावर आहे, या रोगांतून कोणीहि मुक्त नाहीं, ही भूमिका त्यांनी अजून स्वीकारली आहे, असें वाटत नाहीं. ब्राह्मण फक्त जुलमी, अन्यायी, विषमतेचे भोक्ते आणि बाकी सर्व महाराष्ट्रीय समान समतावादी, उदार, नव्या विचारसरणीचा, अशी अजून त्यांची भूमिका असल्याचे दिसते. यामुळे ब्राह्मण या जातीचें वर्चस्व नष्ट करण्यांत त्यांना यश मिळेल, पण ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व कधींच नष्ट होणार नाहीं.
 पुढील काळांत ब्राह्मणेतर समाजाचें पुढारीपण मराठा समाजाकडे येईल असें वाटते. विषमतेच्या ब्राह्मणी धर्माचे उपासक केवळ ब्राह्मणच नसून आपल्याहि अंगी तोच रोग आहे याची दखल त्यांनी घेतली नाही तर, त्यांना ब्राह्मणेतरांचें नेतृत्व करण्यांत यश येईल असे वाटत नाहीं. मराठा- मराठेतर चळवळ शाहू राजर्षींच्या देखतच कशी सुरू झाली हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या आधारे वर दाखविलेंच आहे. ब्राह्मणांना ज्या दुष्कर्मासाठी मराठे दोष देत आले, त्याच दुष्कर्मांत ते आतां आपल्या चळवळीचा बळी देत आहेत, असा ठाकरे यांचा स्पष्ट अभिप्राय आहे. म्हणजे मराठेतर लोक मराठ्यांवर नाराज आहेत. अस्पृश्य समाजांतहि असेच वारे वहात आहेत. अस्पृश्य हे या ब्राह्मणेतरांतून फुटून निघाले आहेत, आणि मराठा पुढारी स्वार्थांध आहेत, असा त्यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे. (अस्पृश्यांच्या चळवळीतील सावळा गोंधळ- भाई अमरसिंग) आणि मराठा समाजाने पहावयाचे ठरविलेच तर त्याला मराठेतर वर्गांच्या या प्रवृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध होतील. अस्पृश्य व आदिवासी हे समाज आतां जोरानें उठावणी करीत आहेत. यावेळी नगरपालिका, जिल्हाबोर्डे, काँग्रेस- समित्या, त्यांतील प्रमुख आसनें, सरकारी अधिकाऱ्यांची बरीचशी आसने आणि मंत्रीमंडळे यांवर सर्वत्र बव्हंशी मराठा वर्ग अधिष्ठित झालेला त्यांना