पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६५
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

असणाऱ्या खेड्यापाड्यांतून अनेक सांपडतील. स्वतःच्या श्रेष्ठपणाची प्रौढी मिरविणे, इतरांना हीन लेखणे त्यांचा संपर्क टाळणे, अंधपणेंच जुने आचारविचार चालवीत रहाणे, आपल्या आचारविचारउच्चाराने इतर जातींचीं, समाजांची मने कशी दुखवतात, त्यामुळे भिन्न जातींत कटुता कशी निर्माण होते व ही कटुता द्वेषभावनेंत परिणत होऊन समाजविघटनेस कशी कारण होते, याची फिकीर कधहि न करणे-हीं जी अपभ्रष्ट सनातन धर्माची लक्षणे ती त्यांच्या ठायीं अजूनहि दिसून येतात. तेव्हां ब्राह्मण समाज सर्वांगानें सुधारला आहे व सामाजिक पुनर्घटनेस सर्वस्वी अनुकूल भूमिका त्याने घेतली आहे, असा पक्ष मला अगदी मांडावयाचा नाहीं. मला ब्राह्मणेतरांच्या निदर्शनास एवढेच आणावयाचे आहे की ब्राह्मण जसा या जुन्या ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वांतून मुक्त झालेला नाहीं तसाच इतर कोणचाहि समाज त्यांतून मुक्त झालेला नाहीं. विकृत अशा सतातन धर्माचीं वरील सर्व लक्षणे मराठ्यांपासून शूद्रअतिशूद्रांपर्यंत प्रत्येक जातींत त्याच प्रमाणांत, आणि पाश्चात्य विद्या त्यांच्यांत कमी प्रसृत झालेली असल्यामुळे, थोड्या जास्त प्रमाणांत दिसून येतात. आणि म्हणूनच माझी त्यांना अशी प्रार्थना आहे कीं, याविषयीं भ्रामक समजुती निर्माण करून त्यांनी पूर्वीप्रमाणेच दुसरी एखादी विपरीत भूमिका घेऊं नये. मागल्या इतिहासाविषयीं अशाच भ्रामक समजुती त्यांनीं निर्माण केल्या. मागल्या सर्व अनर्थाची जबाबदारी ब्राह्मणांवर लादण्याच्या बुद्धीनें क्षत्रियांना त्यांनीं अत्यंत हीन व अवमानकारक भूमिकेवर आणून सोडले. महाराष्ट्रांतल्या मराठा समाजाने अंगीकारलेली ही भूमिका पाहून हा काय विनोद होता कीं दैवदुर्विलास होता, हेच कळत नाहीं. गेल्या आठ-नऊशे वर्षात या देशावर अरब, अफगाण, तुर्क, मोगल, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी आक्रमणे करून आपापली लहानमोठीं राज्य स्थापलीं. त्यांना ब्राह्मणी वर्चस्व सहज उधळून देतां आले. त्यांनी इतर प्रजेबरोबर ब्राह्मणांचेहि वाटेल ते हाल केले, त्यांचे समाजच्या समाज नाहींसे करून टाकले, त्यांचें सक्तीनें धर्मांतर अनेक वेळां अनेक ठिकाणीं केलें, आणि याविरुद्ध प्रतिकार करण्यांत ब्राह्मणांना, कांही अपवाद वजा जातां, इतर समाजाप्रमाणेंच केव्हांहि यश आले नाहीं. कोणीहि येऊन ब्राह्मणी वर्चस्वाचा असा धुरळा