पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६४
भारतीय लोकसत्ता

हंसक्षीर न्यायाने पहात नाहींत. त्यामुळे त्यांनी रजपुतांना भाडोत्री ठरविले, साक्षात् शिवछत्रपतींना ब्राह्मणी वर्चस्वाच्या अधीन झालेले पुरुष असे मानले, जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे पुरस्कर्ते, असा टिळकांवर आरोप केला आणि महात्माजींवरसुद्धां त्याच तऱ्हेचे आरोप करण्यास कमीं केलें नाहीं! अशा स्थितींत गेलीं शंभर वर्षे ब्राह्मणी धर्माचें तत्त्वज्ञान नष्ट करण्याचे स्वतः ब्राह्मणांनींच जे प्रयत्न चालविले आहेत त्याच्या मागची सद्भावना त्यांना कितपत मान्य होईल याची शंकाच आहे. पण तशी सद्भावना आहे असें क्षणभर गृहीत धरून त्यांनी ब्राह्मणांच्या या प्रयत्नांचा विचार केला तर त्यांच्या मनांतील कटुता बरीच कमी होईल असे वाटल्यामुळे त्यांना तशी नम्र विनंति करून हे विवेचन मी करीत आहे.
 विषमतामूलक ब्राह्मणी धर्म नष्ट करण्याचा सुधारकांनी प्रयत्न केलाच आहे. पण अर्वाचीन काळांत शास्त्री पंडितांनीसुद्धां या काम मोठा पुढाकार घेतला आहे. नारायणशास्त्री मराठे या थोर पंडिताला याचे बरेंचसे श्रेय आहे. त्यांच्याशिवाय विद्वद्रत्न के. ल. दप्तरी, महामहोपाध्याय काणे, विद्यावाचस्पति सदाशिवशास्त्री भिडे, महामहोपाध्याय पाठकशास्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर्कतीर्थ पंडित रघुनाथशास्त्री कोकजे यांनी अविश्रांत परिश्रम करून, अनेक ग्रंथ लिहून धर्माला आलेले अमंगल रूप घालवून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. लोणावळ्याचें धर्मनिर्णयमंडळ हे त्याचेंच फल होय. हे मंडळ आतां जातिवर्णनिरपेक्ष कोणाचेहि धर्मसंस्कार वेदमंत्रांनीं करण्यास सिद्ध आहे. भिन्न जातीय विवाह करूं इच्छिणारांनाहि, अनुलोम प्रतिलोम कसलाहि विवाह असला तरी, मंडळ साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहे. तेव्हां आतां उच्चनीचतेचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणधर्माचा ब्राह्मणांनींच कणा मोडून पाडला आहे यांत शंका नाहीं.
 ह्याचा अर्थ असा नव्हे कीं, समाजांतील ब्राह्मणवर्ग त्या जुन्या रूढीच्या दुष्ट वर्चस्वांतून पूर्णपणें मुक्त झाला आहे. तसें प्रतिपादन मला मुळींच करावयाचें नाहीं. अजूनहि सनातन धर्माला दृढपणे कवटाळून बसणारे अनेक ब्राह्मण शहरांतून आणि विशेषतः पाश्चात्य संस्कृतीपासून दूर