पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६३
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

ते कट्टे पुरस्कर्ते होते. ज्या देशांत विचारस्वातंत्र्य नाहीं तो देश मृत समजावा, अशी त्यांची शिकवण होती. जातिभेद किंवा सामाजिक रूढि यामुळे येणारी उच्चनीचता मानावयाची नाहीं, असे लोकशाही स्वराज्य-पक्षाचें धोरण म्हणून त्यांनी जाहीर केले होतें. टिळकांचे हे सर्व कार्य दृष्टिआड करून वेदोक्तासारख्या काही प्रकरणामुळे त्यांना ब्राह्मणीधर्माचे उपासक म्हणावयाचे असेल, तर या आरोपांतून कोणीच सुटणार नाही. महात्माजींनीं चातुर्वर्ण्याचेंच नव्हे, तर जातिभेदाचे कितीतरी ठिकाणी समर्थन केले आहे. पितृपरंपरेनें विशिष्ट गुण माणसाच्या अंगी येतात, त्या गुणांच्या मर्यादा मनुष्याला ओलांडणे शक्य नाहीं म्हणून वर्णव्यवस्थेने सांगितलेले, जन्मानें ठरणारे व्यवसायच माणसाने करावे, असे महात्माजी सांगत असत. (मॉडर्न रिव्ह्यू- ऑक्टोबर १९३५) गांधीजींनी पुष्कळ ठिकाणी जातिभेदास विरोध केला आहे. पुढे पुढे स्पृश्य व अस्पृश्य यांचे विवाहहि त्यांनी घडविले; पण 'विशिष्ट गटांतूनच वधू निवडणे हा फार मोठा संयम आहे, आत्म्यांचा विकास होण्यासाठी मिश्रविवाह व सहभोजन यावर बंदी घालणे अवश्य आहे' अशीहि शिकवण ते देत. (यंग इंडिया ६-१०-२७) आणि तुमच्या विचारांत विसंगति आहे असें कोणी म्हटल्यास त्यांना ते मान्य होत नसे. 'जातिनिष्ठ व्यवसाय' हा तर गांधीवादानें मार्क्सवादावर, आणि आजची आर्थिक क्षेत्रांतली घातकी स्पर्धा टाळण्यासाठी, उपाय म्हणून सांगितलेला आहे. पितृपरंपरेने आलेला व्यवसाय स्वीकारल्यानें मनुष्याच्या शक्तीची बचत होऊन ती शक्ति त्याला आत्मिक उन्नतीसाठी वापरतां येते असें त्यांचें मत होतें. [यंग इंडिया २९-९-२७] या त्यांच्या मतामुळे अस्पृश्यांचे नेते डॉ. आंबेडकर त्यांच्यावर चिडून जात. आणि अस्पृश्यांच्याच नव्हे तर वरिष्ठ ब्राह्मणेतर समाजांतील नेत्यांनी सुद्धां, काँग्रेसचा उपयोग ब्राह्मण करून घेत आहेत, असा यामुळे अभिप्राय दिल्याचें मागें सांगितलेंच आहे. माणूस कितीहि मोठा झाला, त्याच्या वृत्ती कितीहि क्रांतिकारक असल्या, तरी पूर्वरूढींचे संस्कार कोठें तरी त्याच्या मनांत घर करून बसलेले असतात व केव्हां केव्हां ते प्रबल होतात, हे आपण लक्षांत घेतले पाहिजे आणि तेवढ्यासाठी त्याच्या सर्व कार्यावर बोळा फिरविण्याचे धोरण निषिद्ध मानले पाहिजे. पण ब्राह्मणेतर पंडित या जीवनाकडे या