पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६२
भारतीय लोकसत्ता

 विषमतामूलक असा जो सनातन धर्म, ज्याला ब्राह्मणी धर्म असें सर्व ब्राह्मणेतर पंडितांनी संबोधिले आहे आणि जो फक्त ब्राह्मणांनींच प्रसृत केला असा त्यांचा आरोप आहे, तो ब्राह्मणी धर्म नष्ट करावा असा प्रयत्न पाश्चात्य विद्येनें दृष्टि उघडल्याबरोबर स्वतः ब्राह्मणांनीच अट्टाहासाने सुरू केलेला आहे. राजा राममोहन रॉय व त्यांचा ब्राह्मसमाज, रानडे, भांडारकर व त्यांचा प्रार्थना समाज, स्वामी दयानंद व त्यांचा आर्यसमाज हे सर्व याच क्षेत्रांतले प्रयत्न आहेत. लोकहितवादी यांनी या जुनाट व घातकी धर्मावर व त्यालाच चिकटून राहणाऱ्या मूढ ब्राह्मणांवर जितका भडिमार केला तितका ब्राह्मणेतरांनी सुद्धां केला नसेल, आणि माझ्या मते, यासाठीं ब्राह्मण लोक त्यांचे कायमचे ऋणी राहतील. आगरकर व त्यांचा 'सुधारक' यांचा तर रूढधर्माचा विध्वंस करण्यासाठींच जन्म होता हें सर्वश्रुत व सर्वमान्य आहे. विष्णुशास्त्री, टिळक व त्यांची परंपरा यांनी केव्हां कव्हां नव्या सुधारणेस विरोध केला आहे. पण जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे ते पुरस्कर्ते होते असें, त्यांचे लेख ज्यानीं वाचले आहेत त्यांना केव्हांहि म्हणतां येणार नाहीं. या देशांत पूर्वी व आतांहि राष्ट्राभिमान ही निष्ठाच नाहीं आणि ती जातिभेदामुळे नाहीं, असें स्पष्ट सांगून राष्ट्रनिष्ठा अंगीं बाणविण्यासाठी आपण पाश्चात्यांना गुरु केले पाहिजे, असें विष्णुशास्त्री यांनीं निःसंदिग्धपर्णे सांगितलेले आहे. टिळकांनी कोल्हापूरच्या राजर्षि शाहू छत्रपतींच्या वेदोक्ताच्या प्रकरणांत व पुढें पटेल बिलाच्या वेळी सनातन्यांची प्रतिगामी बाजू घेतली ही गोष्ट अत्यंत वाईट झाली, व त्यामुळे आपल्या समाजाची मोठी हानि झाली आहे हे खरे आहे. पण त्यामुळे ते जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे पुरस्कर्ते होते व त्यांना ब्राह्मणी राज्य प्रस्थापित करावयाचें होतें असा आरोप सयुक्तिक होणार नाहीं. १८८१ सालीं लेखणी उचलल्यापासून, गिरण्यांमध्ये फायद्याचा हिस्सा कामगारांना मिळाला पाहिजे, शेतकरी व कारागीर काँग्रेसमध्ये आला पाहिजे, कष्टकरी लोक म्हणजेच देशांतली प्रजा, मँचेस्टरमुळे येथला कोष्टी मरत आहे, चांदी पौंडाची चलाखी करून सरकार शेतकऱ्याला पिळीत आहे, सारावाढीमुळे, सर्व्हे सेटलमेंटमुळे शेतकरी उठकळेस आला आहे, या जनतेला जागृत करणे हेंच सुशिक्षितांचें काम आहे, असा टिळकांनी सारखा धौशा चालविला होता. व्यक्तिस्वातंत्र्याचे