पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६१
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

असें याचें वर्णन केले आहे. पण ठाकरे यांचे मतें, याच वेळीं महात्मा फुले यांचे थोर तत्त्व ब्राह्मणेतरांनी सोडलें. आणि त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळींत दांडगी फूट पडली. कारण एक दलाल जाऊन तेथे दुसरा दलाल आला, इतकाच फरक ! मराठेतर क्षत्रियांना याची फार चीड आली. 'वर्गलढा' हें वर्णन, ठाकरे यांचे मतें, असेंच सयुक्तिक नाहीं. उमरावतीच्या ब्राह्मणेतर काँग्रेसमध्यें ब्राह्मण वगळून बाकीची सारी दुनिया समाविष्ट केली होती. शेतकऱ्यांच्या मुंड्या मुरगळणारे गुजर, मारवाडी, देशाला दारूबाज बनविण्याचा राजरोस मक्ता घेणारे सोमयानी पारशी, कज्जेदलाल वकील इ. शेतकऱ्यांचे खास शत्रू त्यांचे पुढारी बनले. कसाईच गोरक्षणाचे चळवळीचे सूत्रधार बनल्यावर परिणामाची कल्पना सहन येईल. (पृ. ८१) ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या अस्पृश्य पुढाऱ्यांनी मराठ्यांविषयीं हेंच लिहिले आहे. "मराठ्यांनीं ब्राह्मणांना हांकलून देऊन त्यांच्या जागा आपण घेतल्या आहेत. अस्पृश्यांनी आपली मुले शाळेत पाठवूं नयेत म्हणून घरादारांचा नाश करूं अशा त्यांनीं धमक्या दिल्या."

सर्व समाजच रोगग्रस्त

 ब्राह्मणेतर चळवळीला हें जे रूप आले त्यावरून हे स्पष्ट होईल की जन्मनिष्ठ उच्चनीचता हा रोग आपल्या सर्व समाजाच्याच रक्तांत भिनलेला आहे. आणि तो नाहींसा करण्यासाठी सर्व समाजांतल्या पुरोगामी शक्तींनी एकवटून प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या देशांतील प्रत्येक जातींत विवेकी, बुद्धिनिष्ठ व उदार बुद्धीचे, निःस्वार्थी व त्यागी लोक जसे सांपडतात तसेच अविवेकी, अंधनिष्ठ, संकुचित वृत्तीचे, स्वार्थी असेहि लोक सांपडतात. ही वस्तुस्थिति दृष्टीआड केली तर, बाह्मण व ब्राह्मणेतर एवढ्या दोनच फळ्या होऊन समाजाची विघटना तेथें थांबणार नाहीं. तर मराठा व मराठेतर, मराठा क्षत्रिय व इतर क्षत्रिय, महार व महारेतर, अशा सारख्या चिरफळ्या होत जातील. नव्हे, तशा होत चालल्याच आहेत. आणि या प्रवृत्तीला वेळींच पायबंद बसला नाहीं, तर भारतीय समाजाची पुनर्घटना करणे जवळजवळ अशक्य होऊन बसेल.