पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६०
भारतीय लोकसत्ता

यांनी याविषयीं केलेले विवेचन फार उद्बोधक आहे. ब्राह्मणेतरांच्या बाजूनें ब्राह्मणांवर भयंकर भडिमार करणारे हे एक थोर लेखक आहेत. त्यांच्याच शब्दांत या प्रकाराचें वर्णन केलें कीं, त्याकडे कलुषित व पक्षपाती दृष्टीने पाहिल्याचा आरोप येण्याचे कारण उरणार नाहीं. 'शेतकऱ्यांचे स्वराज्य' या आपल्या पुस्तकांत ठाकरे लिहितात- 'जातिभेद, देव- मानवांतला दलाल भट, आणि सामाजिक उच्चनीचता, या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय दोषांवर कट्यार चालविणाऱ्या सत्यशोधक समाजाचा पुरस्कार ब्राह्मणेतरांनी सर्रास केल्यामुळे या चळवळींच्या संघशक्तीचा दुरुपयोग मराठे चळवळे स्वजातिवर्चस्वाकडे करतील, अशी प्रथमतः कोणालाहि शंका आली नाहीं. (पण) मराठे झाले तरी पिण्डानें जातिभेदाळू हिंदूच ! विद्येत अगदींच मागासलेले.... आम्ही करूं ती पूर्व दिशा असा भटी मद त्यांना चढला. केवळ मागासलेल्या खेडवळ ब्राह्मणेतर जनतेची संघटना साधावी तर कार्यकर्त्या मराठ्यांचें वर्तन अनेक मराठेतर समाजांना जाचक होऊं लागले.' (पृ. ८०) यानंतर श्री. ठाकरे यांनी केलेल्या विवेचनाचा सारांश असा:- माँटफर्ड रिफॉर्म्सची नवीं कौन्सिले सुरू होण्याच्या सुमारास तर ब्राह्मणेतर पक्षांत भयंकर उत्पात माजले. मराठामराठेतर भेदाचा पाया याच वेळीं भक्कम पडला. मराठे या वेळेपासून स्वजातिवर्चस्वाची भाषा अट्टाहासाने बोलू लागले. मराठा वृत्तपत्रे मराठेतरांना उघड धमक्या देऊं लागलीं. ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे मराठा चळवळ, असे भाष्य मराठे करूं लागले. क्षत्रिय म्हणजे फक्त मराठे, अशी व्याख्याहि त्यांनीं जाहीर केली. कौन्सिलदाऱ्या, दिवाणगिऱ्या आणि सरकारी नोकऱ्या या खास मराठ्यांना मिळाव्या आणि त्याहि लायकीच्या प्रमाणांत नव्हे, तर लोकसंख्येच्या प्रमाणांत एवढ्याच क्षुद्र बिंदूवर ब्राह्मणेतर चळवळीची भिंगरी फिरू लागली. (पृ. ८०-८२) आज ब्राह्मणेतर चळवळीचें कोणी 'धार्मिक लढा' कोणी 'वर्गलढा' असें वर्णन केले आहे. महात्मा फुले यांची दृष्टि धार्मिक लढ्याची होती. पण ती त्यांच्यापुरतीच राहून पुढें नष्ट झाली. देव व जनता यांच्यांत भट हा दलाल नको, हा धार्मिक लढ्याचा आत्मा होय. पण ब्राह्मणेतर चळवळींचे प्रमुख नेते राजर्षि शाहू यांनींच 'क्षात्रजगद्गुरु' निर्माण केले. प्रा. लठ्ठे यांनी 'ब्राह्मणी वर्चस्वाचा अंत'