पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५९
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

दगडघोंड्यांचा मार खाणारांत न. वि. गाडगीळ, वि. म. भुस्कुटे, देशदास रानडे, बाळूकाका कानिटकर हे ब्राह्मण होते व मार देणारांत ब्राह्मणाप्रमाणेच गुंजाळ, झांजले इ. ब्राह्मणेतर होते. (शिवराम जानबा कांबळे- चरित्र- नवलकर- पर्वतीसत्याग्रह प्रकरण) महर्षि शिंदे अस्पृश्यांत मिसळत, हें सनातन मराठ्यांना मंजूर नव्हते. त्यांच्या भगिनी वारल्या तेव्हां या मंडळींनी खांदा देण्याचें नाकारले. तो नव्या मताच्या मराठयांनी दिला. केशवराव जेधे असेच अस्पृश्यांत वावरत. तेव्हां त्यांच्यावर त्यांच्या समाजाने तीन वर्षे बहिष्कार घातला होता. (सत्याग्रही महाराष्ट्र- प्रेमा कंटक पृ. २२७) याचा अर्थ असा की ब्राह्मणी धर्मातील जन्मनिष्ठ उच्चनीचतेवर मराठ्यांची ब्राह्मणाइतकीच दृढ श्रद्धा होती व आहे आणि त्यांतून मिळणारी सर्व श्रेष्ठता व सुखेंहि त्यांना भोगावयास हवीं आहेत; पण आज त्याची जबाबदारी फक्त ब्राह्मणांवर लादावी असा त्यांचा विचार आहे; आणि तो महात्मा फुले यांनी जागृति आणल्यानंतरहि !

मराठा - मराठेतर

 मराठे हे ब्राह्मणाइतकेच जन्मनिष्ठ उच्चनीचतेचे कट्टर अभिमानी आहेत हें ब्राह्मणेतर चळवळीची थोडी फळे पदरांत पडूं लागलीं तेव्हां स्वच्छ दिसून येऊ लागले. ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली तेव्हां, ब्राह्मण फक्त जुलमी, अन्यायी, विषमतेचे पुरस्कर्ते, आणि बाकी सर्व समाज- मराठे, कुणबी, माळी, लोहार, सुतार, परीट, कुंभार, कोष्टी, साळी, अस्पृश्य- हा समाज दलित अशी भूमिका, या ब्राह्मणेतरांतील नेते जे मराठे, त्यांनी घेतली. आणि त्यासाठीच वर सांगितलेले तत्त्वज्ञान पूर्वीच्या इतिहासाच्या विपरीत मीमांसेच्या आधारे त्यांनी प्रसृत केलें. असें करतांना त्यांनीं खरोखरीच या सर्व समाजाशीं सर्व दृष्टींनीं एकरूप व्हावयाचे ठरविले असते, तर त्या सामाजिक क्रांतीला तुलना नव्हती. सर्व जगांत ती एक अभूतपूर्व गोष्ट घडली असती. पण इतक्या अभूतपूर्व गोष्टी जगांत घडत नाहींत. माँटफर्ड सुधारणा येऊन सरकारी नोकऱ्या व सत्ता हाती येते असे दिसतांच मराठा वर्गाचें स्वरूप बदललें व इतर समाजांना त्याची जाणीव होऊन मराठा व मराठेतर असा भेद निर्माण झाला. प्रबोधनकार ठाकरे