पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५८
भारतीय लोकसत्ता

नव्हती. मराठे हेच म्हणत आले. माझ्या वाडवडिलांनी तरवार मारली, त्यांनी वतन मिळविले, आतां मी तसा पराक्रमी नसलो तरी केवळ त्यांच्या कुळांत आलो आहे, म्हणून मला त्यांचे वतन पाहिजे, माझा तो हक्कच आहे, अशीच मराठ्यांची मागणी आहे. वतन, मिरास, सरदारी, सरंजामदारी, संस्थान व राज्य ही केवळ जन्मानें, वंशपरंपरेनें मिळवणे ही जन्मनिष्ठ उच्चनीचताच आहे. अंगी पराक्रम नसला तरी क्षत्रिय राजाचा मुलगा राज्याचर हक्क सांगतों, आपले श्रेष्ठत्व मिरवितो. त्याचप्रमाणे ब्राह्मणांचा मुलगा अंगी विद्वत्ता नसतांना दक्षिणेवर हक्क सांगतो व मी टोणपा असलो तरी आठ वर्णाचा गुरुच आहे, अशी प्रौढी. मिरवितो. हिंदुस्थानच्या इतिहासांत एकाहि ब्राह्मणेतरानें, मी पराक्रम केला नाहीं तेव्हां मला वतन किंवा सरंजाम नको, राज्य नको, असे कधीहि म्हटलेले नाहीं: केवळ जन्मानें मिळालेले हक्क व सुखे, तेहि, ब्राह्मणाप्रमाणेच, ते योग्यच आहे असें मानून भोगीत आहेत. आणि आपण श्रेष्ठ कुलांतले व इतर हीन कुलांतले असा अभिमान मिरवीत आहेत.
 ब्राह्मणेतरांची ही प्रवृत्ति महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्वीच्या काळी होती व आतां नाहीं, असें मुळींच नाहीं. ब्राह्मणेतर सांगतात कीं, पूर्वी आम्ही मोळे होतो, आम्हांस ब्राह्मणांनी फसविलें, पण महात्मा फुले यांनीं आमच्यांत जागृति केली व आमची दृष्टि उघडली. फुले यांनी ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाविरुद्ध निर्भयपणे झगडा केला. ब्राह्मणेतर समाजाला जागृति आणण्यासाठी सर्व आयुष्य अर्पण केलें हें सत्यच आहे. आणि त्यामुळे आपला सर्वच समाज त्यांचा ऋणी आहे. पण त्यांच्यानन्तरच्या काळांत ही उच्चनीचतेची भावना मराठ्यांच्या वृत्तींतून अजिबात गेली व ब्राह्मणांतच फक्त राहिली असें आहे काय ? जातिभेदाचें व अस्पृश्यतेचे सर्व खापर ब्राह्मणांच्या माथीं फोडणाऱ्या मराठा खानदानी वर्गाने ९६ कुळांच्या बाहेर विवाहसंबंध करण्यास आरंभहि केलेला नाहीं. गांवोगांवीं अस्पृश्यांना, जरा अतिक्रम केल्याबरोबर, झोडपून काढण्यांत तेच पुढाकार घेत आहेत. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळीं, पर्वतीच्या सत्याग्रहाच्या वेळ, अस्पृश्यांना विरोध करणारांत बहुसंख्य ब्राह्मणेतरच होते. पर्वतीवर मंदिरप्रवेशसत्याग्रहाच्या वेळी अस्पृश्यांबरोबर सत्याग्रह करून स्पृश्यांचा