पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५७
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

करमणुकीखातर प्राण घेतला तरी चालत असें. (भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न पृ. १५६) ब्राह्मण व नायर (क्षत्रिय) या दोघांनी, त्यांच्या मतें, अस्पृश्यांना गुलाम बनविले होते. त्यांची आणखीहि एकदोन मतें आत्मनिरीक्षण करतांना ब्राह्मणेतर तरुणांनीं ध्यानांत घ्यावी. बौद्धांची अहिंसा व जैनांचा कडकडीत शाकाहार यामुळे सामाजिक रचनेची संकीर्णता कमी न होतां उलट वाढलीच. आणि त्या काळीं अस्पृश्यतेचें दृढीकरणच झालें, द्रविडांबद्दल त्यांनी लिहिले आहे की, आर्याप्रमाणेच द्रविडांतहि चातुर्वर्ण्य असल्याचे पुरावे सांपडतात. (पृ. ३९) एके ठिकाणी ते म्हणतात की राजपुत, जाठ, गुरखे, मराठे, कुणबी, चित्पावन, नंबुद्री, नायडू, मुदलियार, नायर, पाळेगार- या जाति हिंदुधर्माच्या पोलादी चौकटीत वरिष्ठ स्थान पटकावून बसल्या आहेत. (पृ. १८३) आणि हीच गोष्ट इतिहासप्रसिद्ध आहे. भरतभूमीचें जें जें वैभव आहे त्याचें श्रेय ज्याप्रमाणें क्षत्रियांना व ब्राह्मणांना आहे, त्याचप्रमाणे येथें जें जें हीन आहे त्याचें अपश्रेयहि प्राधान्यानें या दोघांना आहे. माझे तर असें मत आहे कीं या श्रेयाचे व अपश्रेयाचे वाटेकरी या दोघांप्रमाणे इतर समाजहि आहेत. वैश्यांनी व्यापारवृद्धि केली; इतकेच नव्हे तर अनेक वेळां त्यांनीं राज्यकारभारहि केला आहे. आणि भारतीय संस्कृतीचे ते निःसंशय श्रेयभागी आहेत. पण श्रेयाबरोबर अपश्रेयाचीहि जबाबदारी माथीं घ्यावी लागते. नुसत्या श्रेयाची जबाबदारी घेणें व अपश्रेयाची टाळणे याला अर्थच नसतो. तसें केल्यास या समाजाला इतर अनेक अवगुण आपल्या अंग चिकटवून घ्यावे लागतात, इकडे आज लोकांचे दुर्लक्ष होत आहे.
 ब्राह्मण हाच केवळ स्वतःला जन्मानें श्रेष्ठ समजतो व त्या श्रेष्ठत्वाचीं सुखें व हक्क मिळवूं पहातो, आणि मराठे तसें करीत नाहींत, असें आहे काय ? माझे वाडवडील वेदवेत्ते होते, शास्त्री होते, पुण्यशील होते, धर्मनिष्ठ होते म्हणून त्यांच्याप्रमाणे मलाहि, मी तसा नसलों तरी, केवळ मी त्यांच्या कुळांत जन्माला आलो म्हणून तुम्हीं दक्षिणा दिली पाहिजे, माझी पूजा केली पाहिजे, अशी ब्राह्मणांची मागणी होती. आणि ही वृत्ति अगदीं अनिष्ट व घातक होती, यांत शंका नाहीं. पण इतरांची वृत्ति कांहीं निराळी