पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५६
भारतीय लोकसत्ता

बळी पडत होता. तरी रूढ धर्मावरची त्यांची अंधनिष्ठा कमी झाली नाहीं. त्यामुळे समाजाच्या नाशाच्या कारणांची मीमांसा करून त्यावर उपाययोजना करण्याची ऐपत त्यांच्याठायीं कधींहि निर्माण झाली नाहीं. ज्ञानेश्वराला त्यांचा विरोध, एकनाथाला विरोध, तुकारामाला विरोध, शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध, आणि थोरल्या बाजीरावावर सामाजिक बहिष्कार घालण्याची त्यांची तयारी ! शिवछत्रपति ही केवढी दिव्य शक्ति आहे, त्यांचा पराक्रम हिंदुधर्माचा कसा उत्कर्ष घडवीत आहे, या भूमीचा सर्व इतिहास बदलून टाकण्याचे सामर्थ्य त्यांच्यांत कसें आहे, हे या सनातन शास्त्री, पंडित, भिक्षुक या वर्गाला आकलनच झालें नाहीं. कलावाद्यन्तयोः स्थितिः। नन्दांतं क्षत्रियकुलम् । ही वचनें मूढपणें उराशीं धरून त्यांनीं शिवप्रभूच्या क्षत्रियत्वाला व म्हणूनचं राज्याभिषेकाला विरोध केला. आणि सनातन भिक्षुक वर्गाची हीच वृत्ति गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत जवळ जवळ कायम होती.
 पण याचा अर्थ असा नव्हे की इतर कोणी जाती किंवा इतर कोणी समाज या जन्मनिष्ठ उच्चनीचतेच्या घातक तत्त्वाच्या वर्चस्वापासून मुक्त होते. तसे असतें तर त्यांनीं या धर्माविरुद्ध तेव्हांच संग्राम करून या राष्ट्राला वांचविलें असतें. छत्रपतींच्या राज्याभिषेकाला जसा अंध, सनातनधर्मनिष्ठ शास्त्री-पंडितांचा विरोध होता, तसाच श्रेष्ठ, खानदानी कुळांतल्या मराठ्यांचाहि होता. भोसल्यांचें कुळ ते कमी समजत. 'मोहिते, महाडिक, निंबाळकर, सावंत, जाधव, घोरपडे वगैरे बडे बडे मराठे सरदार पहिल्यापासूनच शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या कल्पनेला विरुद्ध होते.' असे सांगून प्रबोधनकार ठाकरे यांनी त्या वेळच्या मराठ्यांवर कडक टीका केली आहे. आणि आपल्या म्हणण्याच्या सिद्धयर्थ इतिहासपंडितांचा उताराहि दिला आहे. (कोदण्डाचा टणत्कार. पृ. ३६, ३७.) ही खुद्द शिवछत्रपतींच्याबद्दल त्यांची दृष्टि; मग मराठेतर समाजांबद्दल– कुणबी, माळी, लोहार, कुंभार, कोळी, परीट या एकंदर समाजांबद्दल काय असेल त्याची सहज कल्पना येईल. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी याविषय उद्बोधक माहिती दिली आहे. मद्रासकडे नायर हे जमीनदार होते. त्यांतील नायर शिलेदारानें चेरुमाचा (हीन जातीयाचा)