पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५५
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

वृत्ति निर्माण होते. उत्कर्षाप्रमाणेच आपल्या अपकर्षालाहि आपले आपणच जबाबदार आहों ही भूमिका जीवनदायक आहे. तिच्यामुळे मन समर्थ व सकस बनते. ब्राह्मणेतर तरुणांनीं इतिहासाकडे या दृष्टीने पहावें अशी माझी त्यांना विनंति आहे. आपला अधःपात झाला तर इतर बाहेरची कारणे दर वेळी कांही तरी असणारच; पण खरे कारण आपल्याठायीच आहे, हें प्रत्येक समाजाने जाणले पाहिजे. ही जाणीव व तज्जन्य जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्यावांचून कोणच्याहि समाजाचा उत्कर्ष होणार नाहीं.

समाजरचनाच विषम

 जन्मनिष्ठ उच्चनीचतेचा ब्राह्मणीधर्म हा ब्राह्मणांनी निर्माण केला, जातिभेद त्यांनी पसरून दिले, आम्ही तो धर्म प्रस्थापित करण्यास साह्य केले असले तरी ते त्यांच्या प्रेरणेने केलें, आजहि आमच्यांत जन्मनिष्ठ उच्चतेची भावना जरी असली तरी ती ब्राह्मणांच्या चिथावणीनेंच टिकून आहे, ही भूमिकाहि याच तऱ्हेची आहे. दुर्दैवानें हिंदुस्थानांतील समाजरचनेचे तत्त्वज्ञान बव्हंशीं विषमतेवरच उभारलेले आहे. इ. स. पूर्वी समतेची कांहीं तरी भावना होती असे दिसून येतें. पण पुढे हळूहळू ती नष्ट होत गेली. अविद्वांश्चैव विद्वांश्च ब्राह्मणः पूज्यते सदा । ब्राह्मण विद्वान् असो, अविद्वान् असो, तो पूज्यच आहे, असें तत्त्व मनूनें मांडलें. आणि 'टोणपा ब्राह्मण असेल साचा, तरी तो गुरु आठ वर्णाचा', 'जरी ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तरी तो तीन्ही लोकीं श्रेष्ठ' अशा तऱ्हेची विचारसरणी रूढ झाली. जातींची व उच्चनीचतेचीं बंधनें साधारण दहाव्या शतकाच्या सुमारास कडकपणें अमलांत येऊं लागलीं; आणि तेव्हांपासूनच हिंदुस्थानच्या विनाशास प्रारंभ झाला.
 जन्मनिष्ठ उच्चनीचतेचें हें, जे तत्त्व, ही जी समाजघातक विषमता तिचा तत्कालीन ब्राह्मणांनी अतिशय हिरिरीनें पुरस्कार केला ही गोष्ट खरी आहे. बाराव्या तेराव्या शतकापासून इंग्रजांचे राज्य प्रस्थापित होऊन पाश्चात्य विद्या येथे येईपर्यंत सनातन ब्राह्मणवर्गाची दृष्टि अत्यंत संकुचित व हीन होऊन गेली होती. सर्व समाजाचा हळूहळू ऱ्हास होत होता, परक्यांच्या आक्रमणास देश