पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५४
भारतीय लोकसत्ता

मृत्यूनंतर २५ वर्षांचा लढा जिंकल्यानंतर त्यावेळचे प्रमुख मराठे कोणत्या तरी एका बाजूस दृढपणे चिकटून रहाते तर पेशवाईचा उदयच झाला नसता; पण तें धोरण न अवलंबितां त्या वेळचे प्रमुख सरदार- चंद्रसेन जाधव, रावरंभा निंबाळकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण, हिंदुराव घोरपडे हे दोन्ही पक्ष सोडून मुसलमानांना जाऊन मिळाले. पुढे पेशवाई आली. तेव्हां मराठा सरदारांची आपसांतील वैरें ब्राह्मणप्रेरित होती असा दावा मांडणें तरी शक्य आहे; पण पेशवाई संपल्यावर शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले असे मातबर सरदार स्वतंत्र फौजा संभाळून होते. त्यांनी ऐक्य करून सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींचा पाठपुरावा केला असता तर इंग्रजी राज्य झाले नसतें; पण इंग्रजांनीं भेदनीतीचा अवलंब करून त्यांच्यांत दुही माजविली. त्यामुळेच हे एकेकटे इंग्रजाशी लढून सर्व पराभूत झाले. याचा अर्थ असा आहे की, आपल्या या भूमीत सर्व समाज संघटित करून ठेवील इतकी प्रबळ अशी कोणचीच निष्ठा त्यावेळी नव्हती. स्वामिनिष्ठा नव्हती, धर्मनिष्ठा नव्हती व राष्ट्रनिष्ठा हा शब्दच आपण ऐकला नव्हता; आणि अशा निष्ठेच्या अभावीं येथले ब्राह्मण, येथले क्षत्रिय, येथले जैन, गुजराथी, मारवाडी इ. व्यापारी वैश्य आणि इतर सर्व जनता यांच्यांत वाटेल तेव्हां फूट पडत असे. कधीं मोंगल यादवी माजवीत, कधीं इंग्रज माजवीत. कधीं तेच इतर स्वार्थी विचारांनी परस्परांत फूट पाहून आपापला पक्ष बळकट करीत. अशा स्थितींत एका जमातीनें किंवा वर्गाने दुसऱ्यावर, यांनी आमच्यांत मुद्दाम दुही माजवून आमचा नाश घडविला, असा आरोप करणे एकतर इतिहासाच्या दृष्टीनें सयुक्तिक नाहीं, आणि दुसरे म्हणजे अशानें जी पराभूत वृत्ति व जे न्यूनगंड निर्माण होतात ते त्या समाजालाच फार घातक होतात. ब्राह्मण दुही माजवू शकतात, मोंगल यादवी चेतवूं शकतात, इंग्रजहि आमच्यांत फूट पाडतात, असें सारखें म्हणत बसून आपल्या अधःपाताची जबाबदारी दुसऱ्यावर टाकल्याने समाज मनानें पेंगुळतो. आपल्यांत दुसरे लोक यादवी माजविणार, ते आपल्याला फसविणार आणि आपण त्या भेदनीतीला तोंड देण्यास असमर्थ आहो, असा याचा अर्थ होऊन समाज हतप्रभ होतो. परक्यानें कोणीतरी आपले रक्षण केले पाहिजे, आपला मार्ग सुकर केला पाहिजे, अशी परावलंबी