पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५३
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर


इतिहासाची साक्ष

 पूर्व इतिहासांत जेव्हां जेव्हां क्षत्रियाक्षत्रियांत यादवी माजली तेव्हां तेव्हां ती ब्राह्मणांनीं माजविली, आम्ही भोळेभाबडे म्हणून फसलों, ही भूमिका स्वतःला अवमानकारक म्हणून तर ती क्षत्रियांनी पत्करूं नयेच; पण ती इतिहाससिद्ध नाहीं हेंहि त्यांनीं ध्यानांत घ्यावें. ज्या यादवीशीं ब्राह्मणांचा चुकूनहि संबंध नाही अशी यादवी कितीतरी वेळां क्षत्रियांत उद्भवली आणि त्यांच्या नाशास कारण झाली, हें इतिहास सांगत आहे. पृथ्विराज व जयसिंग यांच्यांतील वैमनस्य व त्याचे अनर्थकारक परिणाम सर्वश्रुत आहेतच. दक्षिणेतील मुसलमानी राज्यांत अनेक मराठे सरदार होते. त्यांत भोसले, जाधव, घोरपडे यांची आपसांत कशीं भयंकर वैरें माजलेली होती आणि एकमेकांचा अधःपात घडवून आणण्यास ते कसे टपलेले असत, हेंहि इतिहासाला माहीत आहे. यांत ब्राह्मणांचा कांहींच संबंध नव्हता. खुद्द शिवछत्रपतींच्या विरुद्ध चंद्रराव मोऱ्यांसारखे किती तरी मराठे सरदार होते. प्रत्यक्ष त्यांचा भाऊ त्यांना कधींच वश झाला नाहीं. तो विजापूरशींच एकनिष्ठ राहिला आणि त्यांचा पुत्र तर मोगलांना जाऊन मिळाला होता. प्रबोधनकार ठाकरे यांनी संभाजीला दोष लावणाऱ्यांना नांवें ठेवून त्याच्या या कृत्याचे समर्थनच केले आहे. त्यांचे म्हणणें असे कीं, घरांत सावत्र आई होती म्हणून संभाजी कंटाळला होता. त्याच्या कर्तबगारीस स्वराज्यांत वाव मिळेना. ह्यास्तव, मोगलाईत का होईना पण मर्दपणास वाव मिळेल, म्हणून संभाजी तिकडे गेला ! छत्रपतींच्या राज्यांत सामान्य शेतकऱ्यांचे सेनापति झाले. मावळे, हेटकरी, भंडारी- सर्वांच्या कर्तृत्वास वाव मिळाला, तेथे प्रत्यक्ष युवराजाच्या कर्तृत्वास मात्र वाव मिळत नव्हता ! असो. पुढील काळांतील संताजी व धनाजी यांचें वैर महाराष्ट्राला किती घातक ठरले ते सर्वांना माहीतच आहे. ते ब्राह्मणांनीं माजविलें असें अजून कोणी म्हटलेलें नाहीं. संताजीचे मुंडकें तोडणारा एक मराठाच होता. शाहू व ताराबाई यांच्या वैराची हीच कथा आहे. हें मुद्दाम पेटविले असले तर ते मोंगलांनी पेटविलें होते आणि औरंगजेबाच्या
 भा. लो..... २३