पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५२
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

महाराष्ट्रांत जी शांतता राहिली याचं कारण केवळ महात्मा फुले यांचें अनुयायी किंवा ब्राह्मणेतर पक्षाचे लोक होत. ब्राह्मणांच्या ब्रिटिश द्वेषाच्या चळवळीला आळा बसला असला तर त्याचें कारणहि हेच लोक होत. पण ब्रिटिश साम्राज्याच्या या दोस्तावरच आज टाइम्सकार आग पाखडीत असून साम्राज्य उलथून पाडणाऱ्यांच्या गळ्याला ते मिठी मारीत आहेत. (उतारा सत्याग्रही महाराष्ट्र- पृ. २२७)
 ब्राह्मणेतरांनी आपली चळवळ उभारतांना तत्त्वज्ञानाची जी बैठक स्वीकारली तिचा आढावा घेऊन आपण एका दृष्टीने तिचें परीक्षण केलें. पूर्वकाळच्या इतिहासाची त्यांनीं अत्यंत विपरीत मीमांसा करून क्षत्रिय वर्गाला व एकंदर ब्राह्मणेतर समाजाला आत्मप्रत्ययहीन दुर्बल व ध्येयहीन ठरवून टाकले. आणि ही मीमांसा केवळ तात्त्विक मर्यादेंत न ठेवतां ती अक्षरशः खरी मानून ब्राह्मणी वर्चस्व आमचे आम्ही हाणून पाडू शकणार नाहीं, यासाठी ब्रिटिशांचे राज्यच येथे दीर्घकाल राहिले पाहिजे, इंग्रज गेले तर पुन्हां आम्ही ब्राम्हणी धर्माच्या मगरमिठींत सांपडूं- श्रीकृष्ण, रामचंद्र, चंद्रगुप्त, शिवाजी, हे आमचे महापुरुषदि त्यांतून सुटू शकले नाहींत- अशी दैन्याची व परावलंबनाची भूमिका त्यांनी पत्करली.
 ब्राह्मणेतर विद्वानांनी स्वीकारलेल्या या भूमिकेमुळे त्यांच्याच वर्णनांतून क्षत्रिय समाजाविषयीं काय अभिप्राय प्रगट होतो, त्यांचे मानसिक व बौद्धिक सामर्थ्य याविषयी काय मापन होतें, या दृष्टीनें येथवर परीक्षण केलें. आतां त्या भूमिकेचे ऐतिहासिक दृष्टीनें थोडें परीक्षण करावयाचे आहे. आणि त्यानंतर त्या भूमिकेचें ब्राम्हणेतर समाजावर किती घातक परिणाम झाले आहेत व अजूनहि होण्याचा संभव आहे व एकंदर भारतीय समाजावर यापुढे त्याचे काय परिणाम होतील याचें विवरण करावयाचे आहे.