पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५०
भारतीय लोकसत्ता

होईल. आणि मग अस्पृश्यांची स्वातंत्र्य, समता, सुख, उत्कर्ष यांची आशा समूळ नष्ट होऊन ते केवळ मजूर होऊन रहातील.' (पृ. १६७) डॉ. आंबेडकरांच्या मतें ब्रिटिशांशी लढा करण्याचीच जरूर नव्हती. काँग्रेसनें हा नसता उद्योग केला. ब्रिटिश सरकारची वृत्ति बदलत असून आपण आपसांत ऐक्य केले कीं ते निश्चित स्वराज्य देतील. ब्रिटिशांच्या सद्भावनेवर काँग्रेसनें अविश्वास का करावा हेच त्यांना कळत नाहीं. (पृ. १७७-८०) १९३० सालीं एकदां आंबेडकरांचे मत निराळें होतें. त्यांचाहि ब्रिटिश सरकारवर विश्वास नव्हता. एका भाषणांत त्या सालीं ते म्हणाले की, 'आम्ही इंग्रजांच्या बाजूनें पूर्वी लढलो. त्यावेळी इंग्रज आम्हांला तारतील असें आम्हांला वाटले होते. पण आमची फसगत झाली. इंग्रजांच्या वतीनें लढून आमचें कांहीं एक हित झाले नाहीं. त्यांना लढाया करावयाच्या होत्या तोपर्यंत त्यांनी आम्हांला हाताशी धरले. नंतर गरज सरो वैद्य मरो, अशी स्थिति झाली. तेव्हां स्वराज्य हेच अस्पृश्यतेवर औषध आहे. आमच्या बेड्या स्वराज्यांतच तुटतील. बाकीच्या लोकांना जे राजकीय हक्क आहेत ते आम्हांला स्वराज्यांतच मिळतील.' (प्रभात २४-११-३०) १९३० साली आंबेडकरांचे हे मत होते. पण पुढे त्यांचें व त्यांच्या अनुयायांचे मत बदलले आणि इंग्रज हाच आपला उद्धारकर्ता होय, आपले रक्षण व उत्कर्ष तोच करणार, म्हणून ब्रिटिश विरोधी चळवळ व लढा हा आपल्या समाजाला घातक ठरेल, हीच ब्राह्मणेतरांची प्रारंभींची भूमिका त्यांनीं स्वीकारली. वास्तविक ब्राह्मणेतरांनीं ही भूमिका १९३० च्या सुमारास सोडली. इंग्रजांच्या स्वरूपाचे ज्ञान होऊन ते संग्रामांत उतरले. पण अस्पृश्यांनीं १९४५ सालीं सुद्धां ती सोडली नव्हती.
 आपण ब्रिटिश राज्याशीं एकनिष्ठ आहों, ही गोष्ट ब्राह्मणेतर किती अट्टाहासाने सांगत त्याचें एक उदाहरण देतो. ब्राह्मणब्राह्मणेतर वादांत १९२१-२२ च्या सुमारास अत्याचार होऊं लागतांच खटलेहि खूप झाले. व आततायी ब्राह्मणेतरांना शिक्षा झाल्या. त्याबद्दल विजयी मराठा पत्रानें सरकारविरुद्ध पुढील तक्रार केली आहे. 'प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमन- प्रसंगींची पुणे शहरांतल्या ब्राह्मण चळवळ्यांनी उत्पन्न केलेली परिस्थिति तरी टाइम्सपुढे उभी रहावयास पाहिजे होती. त्यावेळीं व आजतागायतहि