पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण दुसरें


मानवत्वाची प्रतिष्ठा



अद्भुत घटना

 गेल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे या भरतभूमींत सध्यां जी लोकसत्ता प्रस्थापित होत आहे, ती प्राचीन परंपरेंतून उद्भवलेली नाहीं. प्राचीन काळीं येथें जीं लोकराज्ये निर्माण झाली होतीं तीं पुढें नष्ट झालीं आणि त्यांची स्मृतीहि नाहींशी झाली, त्यामुळे अर्वाचीन काळांत भारतांतील नेत्यांना सगळी नवी सृष्टी उभारावी लागली. ती सृष्टी उभारतांना त्यांनी ब्रिटिश लोकसत्तेचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला होता. त्यांनीं आपल्या सर्व प्रेरणा तेथून घेतल्या होत्या. सुदैव असे की, हे अत्यंत बिकट कार्य करण्यास या भूमीला राममोहन रॉय, दादाभाई, रानडे, टिळक, विवेकानंद, लजपतराय, महात्माजी, सुभाषचंद्र, पंडित जवाहरलाल यांच्यासारखे अद्वितीय कर्ते पुरुष लाभले. पाश्चात्य जीवनांतील लोकसत्तेचें अमृत तत्त्व घेऊन ते आत्मसात् करून या देशांतील जनतेच्या मनावर आज शंभर- दीडशे वर्षे त्यांनी सारखे त्याचें सिंचन चालविलें आहे आणि त्यामुळेच गेली पाचसहा वर्षे या भरतभूमींत एक चमत्कार घडून येत आहे. एक अगदीं असामान्य, अलौकिक, किंबहुना जवळजवळ अगदीं अद्भुत अशी घटना येथें घडून आली आहे व येत आहे. स्वातंत्र्यप्रस्थापना ही ती घटना नव्हे. ती आपल्या दृष्टीने असामान्य व अलौकिक अशी असली तरी जगाच्या दृष्टीने व एकंदर इतिहासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण अशी ती घटना नाहीं; पण त्या स्वातंत्र्य- प्रस्थापनेनंतर येथे लोकसत्ता प्रस्थापित झाली आहे आणि ही घटना मात्र त्रिखंडाच्या आतांपर्यंतच्या इतिहासांत अगदीं निस्तुळ अशी आहे.
 गेल्या नऊशें वर्षात ही भरतभूमि अगदीं स्वतंत्र अशी केव्हांच नव्हती. राजस्थानांतील रजपूत, विजयनगरचे कर्नाटकी व महाराष्ट्रांतले मराठे यांनी अधूनमधून स्वातंत्र्याच्या चित्कळेचे दर्शन येथील जनतेला घडविले; पण