पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५
मानवत्वाची प्रतिष्ठा

एकतर तें अल्पकालिक होते व दुसरे म्हणने अखिल भारतीय जनतेला असे हें दर्शन केव्हांच घडलें नाहीं. त्या त्या प्रांतापुरतेच ते मर्यादित होते. या नऊशे वर्षांच्या काळांत येथे ज्या राजसत्ता होत्या त्यांना स्वसंरक्षणाखेरीज दुसरे फारसे कांहीं साध्य झालें नव्हतें. लढाया करणे, करवसुली करणें व बंदोबस्त ठेवणें यापेक्षां जास्त कांहीं करण्यास त्यांना अवसरच नव्हता आणि तशी त्यांची दृष्टीहि नव्हती. स्वकीय सत्तांची ही स्थिति. मग परकीय सत्तांचें काय सांगावयाचे आहे ? त्यांतील बहुतेक जुलमी, अविवेकी, अज्ञ, हेकट व मदांध अशाच होत्या. ब्रिटिशांच्या पूर्वीच्या आक्रमकांना राज्य चालविण्यापलीकडे समाजसंवर्धन म्हणून सत्ताधाऱ्यांचा कांहीं उद्योग असतो, याची जाणीवहि नव्हती आणि अशा आक्रमकांच्या वर्चस्वाखालींच हा देश सातआठशे वर्षे पिचत पडला होता. इतक्या दीर्घकाळपर्यंत पारतंत्र्यांत कुजत पडलेल्या या भूमीने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एकदम लोकसत्ता प्रस्थापिली आणि गेलीं पांचसहा वर्षे, अगदी प्राथमिक निकषानें पहातां, ती यशस्वी करून दाखविली, जगांत तिला थोडी प्रतिष्ठाहि प्राप्त करून दिली, या यशाला जगाच्या इतिहासांत तोड नाहीं.

अपूर्वत्व कशांत आहे ?

 कसलीहि पूर्व परंपरा नसतांना आपल्या लोकांनीं स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरच्या लगतच्या पांचसहा वर्षात लोकसत्ता प्रस्थापित करून ती टिकवून दाखविली, या यशांत जसे या लोकसत्तेचें असाधारणत्व आहे तसेंच दुसऱ्याहि एका दृष्टीनें तिचें असाधारणत्व प्रतीत होईल. पाकिस्तान वगळले तरी हिंदुस्थानची लोकसंख्या ३५-३६ कोटीच्या आसपास आहे. एवढी प्रचंड जनता लोकायत्त शासनाच्या अधीन झाल्याचे जगांतले हे पहिलेच उदाहरण आहे. ब्रिटनची आजची लोकसंख्या ५॥- ६ कोटी आहे आणि सर्वात मोठे लोकायत्त राष्ट्र जें अमेरिका त्याची लोकसंख्या १३-१४ कोटी आहे. रशियांत लोकसत्ता आहे असे काहीं लोकांचे मत आहे. क्षणभर खरें मानले तरी भरतभूमीचें असामान्यत्व भंगत नाहीं. कारण रशियाची लोकसंख्या वीस कोटींपर्यंत आहे. चीनमध्ये लोकसत्ता प्रस्थापित झाली असती, तर ती मात्र भरतभूमीच्या तुळेला उभी राहिली असती; पण