पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

निर्माण होऊन त्या लाटेत भारतीयांचे सांस्कृतिक क्षेत्रांतले सर्वच कर्तृत्व लुप्त झाले. तत्त्वज्ञान, काव्य, नाटक, स्मृति, धर्मशास्त्र, वैद्यक, ज्योतिष, रसायन, इतिहास, अर्थशास्त्र, राजकारण यापैकी कोणच्याहि क्षेत्रांत या सातआठशे वर्षांत एकहि मौलिक संशोधनात्मक किंवा प्रतिभाप्रेरित असा ग्रंथ झाला नाहीं. प्रजासत्ताक क्षेत्रांतलेच नव्हे तर सर्वच क्षेत्रांतले भारतीयांचे कर्तृत्व या युगांत लुप्त झाले होते. इंग्रजी आक्रमण येथे आले, त्या वेळीं असा हा गलितगात्र, कर्तृत्वशून्य भारती राष्ट्रपुरुष त्याच्यापुढे उभा होता. त्यामुळे या संग्रामांत तो पराभूत झाला त्यांत नवल नाहीं. या पराभवामुळे आलेली स्तिमितता कांही काळाने दूर होतांच इतर क्षेत्रांत त्याने आपल्या जुन्या परंपरेच्या स्मृति जागृत करून आपल्या नागरिकांच्या अंगी चैतन्याचा संचार घडविला. पण लोकसत्तेच्या परंपरा पूर्वी निर्माणच झाल्या नसल्यामुळे त्या क्षेत्रांत त्याला श्रीगणेशापासून सर्व विद्या पाश्चात्यांकडून घ्यावी लागली. आज भारतांत लोकसत्तेचे जे आचार, विचार, कल्पना, तत्त्वें, यंत्रणा इ. घटक दृष्टीस पडतात, ते सर्व आपण पाश्चात्यांकडून घेतले आहेत. त्यांत पूर्व- परंपरेचा अंश यत्किंचितहि नाहीं.
 अर्थात् आज यामुळे दुःख करीत बसण्याचें कारण आहे असें नाहीं. संस्कृतीची ही देवाणघेवाण जगांत अपरिहार्य अशीच आहे. ब्रिटिशांकडून घेतलेले तत्त्वज्ञान आपण आत्मसात् केलें, आपल्या समाजाच्या रक्तांत तें भिनविलें, सतत संस्कार करून भारतीयांचा मनःपिंडच बदलून टाकला तर पुढेमागे लोकसत्तेचे तत्त्वज्ञान आपण पाश्चात्यांकडून घेतले आहे याची आठवणहि आपल्याला रहाणार नाहीं. गेल्या शतकांत राममोहन रॉय, दादाभाई, रानडे, महात्मा फुले, टिळक, आगरकर या विभूतींनी या दिशेने अत्यंत निष्ठेनें प्रयत्न केले आणि त्यांतून भविष्यकालाविषयी बरीच आशाहि निर्माण झाली आहे. त्यांच्या त्या प्रयत्नांचा इतिहासच आतां आपणांस पहावयाचा आहे.



भा. लो....३