पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४८
भारतीय लोकसत्ता

सत्तेविरुद्ध चालू असलेल्या चळवळीपासून उत्पन्न होणाऱ्या दुष्परिणामांचें उघड दिसणारें स्वरूप या सर्वांमुळे हे लेख लिहिण्याची इच्छा उत्पन्न झाली, हें येथे सांगणे अवश्य आहे. या पुस्तकांतील प्रकरणांना त्यांनीं, ब्रिटिश-साम्राज्याचा अरुणोदय, सूर्योदय, अशीं नांवें दिली आहेत. इंग्रज बहुजन- समानाची काळजी करीत नाहींत, त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात, अशी तक्रार मधूनमधून फुले व लठ्ठे यांनी केली आहे. पण त्यांच्यामतें याचे कारण असे की ब्राह्मण इंग्रजांनाहि फसवितात ! क्षत्रियवर्ग आपसांत लढतो, जातिभेदाच्या विषमधर्मांस साह्य करतो त्याचे कारण ब्राह्मणेतरांच्यामतें, ज्याप्रमाणे भोळेपणा, अज्ञान, भाबडेपणा हे आहे त्याचप्रमाणे इंग्रजांच्या बाबतींतहि भोळेपणा अज्ञान हेच कारण आहे. साहेबांना हिंदी जनतेची खरी तळमळ आहे. तिचा उद्धार करावा ही उत्कट इच्छा आहे. पण त्यांना येथल्या परिस्थितीचे मुळींच ज्ञान नाहीं. म्हणून त्यांनीं पाश्चात्य विद्या फक्त ब्राह्मणांनाच दिली. (छत्रपति शाहू चरित्र पृ. ३२१-२४.) इंग्रज सरकार अत्यंत भोळे असून भटांनीं त्यांच्या डोळ्यांत माती टाकली. (गुलामगिरी-फुले- पृ. १०४) एरवीं ते ब्राह्मणेतरांचे वाली आहेत. अशी ब्राह्मणेतरांची विचारसरणी असल्यामुळे ब्रिटिश राज्याशी एकनिष्ठ रहाणे अत्यंत अवश्य आहे या विचाराचा त्यांनीं १९३०-३५ पर्यंत पाठपुरावा केला होता. मद्रासमध्ये याच तऱ्हेची विचारसरणी ब्राह्मणेतर पक्षानें रूढ केली होती. १९१७-१८ या सालीं सुरू झालेल्या होमरूलच्या चळवळीला विरोध म्हणून ब्राह्मणेतरांनी चळवळ सुरु केली. ब्रिटिश राज्यच आम्हांला जास्त पसंत आहे, कारण स्वराज्य आलें तर ब्राह्मणी राज्य होईल, तेव्हां सत्तादान करूं नये, अशी त्यांची मागणी होती. जस्टिस पार्टीचे अध्वर्यु डॉ. नायर हे ब्रिटिश सरकारपुढे ब्राह्मणेतरांचे गाऱ्हाणे सांगून स्वराज्याच्या मागणीस विरोध करण्यासाठी विलायतेलाहि गेले होते. (लँड मार्क्स इन्ं इंडियन कॉन्स्टिटयुशन ॲन्ड नॅशनल डेव्हलपमेन्ट, खंड १ ला- पृ. ३५२- गुरुमुख निहालसिंग) वर उल्लेखिलेले मलबारचे स्वामी धर्मतीर्थजी यांनी १९४१ सालीं सुद्धां याच तऱ्हेने प्रतिपादन केलें आहे. 'परकीय वर्चस्व अहितकारकच असतें असें नाहीं, बुद्धीनें व धनानें आपण समर्थ आहे. तेव्हां आणखी कांही वर्षे- कांहीं दशकें- ब्रिटिशांचें राज्य