पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४७
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

स्वातंत्र्याला लायक होऊं. अमुक एका वर्गाच्या किंवा जातींच्या वर्चस्वांतून इंग्रज आम्हांस सोडविणार अशी ती भूमिका नव्हती. ब्राह्मणेतरांची भूमिका तशी होती. मागील इतिहासमीमांसा अक्षरशः खरी मानून त्यांनी मनाशीं सिद्धान्तच ठरवून टाकला होता की ब्राह्मणांचें वर्चस्त्र नष्ट करणे आपणांला शक्य नाहीं. इंग्रजांनीं तें वर्चस्व मोडून द्यावें. आमचें दास्य त्यांनीं नष्ट करावें. तसें त्यांनी केले नाहीं तर स्वातंत्र्य येतांच पुन्हां येथे ब्राह्मणी राज्य प्रस्थापित होईल. अशी ही भूमिका होती. इंग्रज हा आपला उद्धारकर्ता नव्हे, तो आपला शत्रू आहे, आपल्या देशाचा व समाजाचा उद्धार स्वावलंबनानें आपणच केला पाहिजे, त्या कामीं इंग्रज साह्य तर करणार नाहींच, पण उलट पावलोपावलीं तो अडथळाच आणील, हे तत्त्वज्ञान प्रथम विष्णुशास्त्री यांनी सांगितले व टिळकांनी आमरण त्याचा प्रसार केला. या त्यांच्या प्रयत्नाविषयीं प्रा. लठ्ठे यांनी असे म्हटले आहे कीं, ब्राह्मणांना प्रारंभी सरकारी खात्यांत पुष्कळ नोकऱ्या मिळाल्या. १८७५ च्या सुमारास नोकऱ्यांचे प्रमाण आणखी वाढावयास हवें होतें, ते वाढेना. कारण खालच्या दर्जाच्या जागाच संपल्या. वरच्या दर्जाच्या म्हणजे कलेक्टर, डी. एस्. पी. अशा जागा इंग्रज सरकार ब्राह्मणांना देईना; म्हणून ब्राह्मणांनी इंग्रजांविरुद्ध चळवळ सुरू केली. विष्णुशास्त्री, टिळक, राष्ट्रीय-पक्ष यांच्या चळवळीविषयीं ब्राम्हणेतरपक्षाचे हे मत आहे. महात्मा ज्योतिबा यांच्याप्रमाणेच 'इंग्रज हा ब्राह्मणेतरांचा उत्कर्ष करतो, त्यांना जागृत करतो, त्यांची उन्नति करतो म्हणून ब्राह्मणांना इंग्रजांचा द्वेष वाटतो' असें प्रा. अ. बा. लठ्ठे यांनीं १९२४ सालीं मत दिले आहे. (छत्रपती शाहूचरित्र- पृ. ३२४-२५) तेव्हां इंग्रज हे आपले उद्धारकर्ते होत, स्वराज्य देऊन ते येथून गेले तर येथें ब्राह्मण पुन्हां ब्राह्मणी राज्याची प्रस्थापना करतील, म्हणून इंग्रजाविरुद्ध लढा करावयाचा नाहीं - ही भूमिका ब्राह्मणेतरांनीं स्वीकारलेली होती. प्रा. लठ्ठे यांनीं 'हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्याचा उदय' या नांवाचें पुस्तक लिहिले आहे. त्याच्या प्रस्तावनेंत ते पुस्तक लिहिण्याचे कारण त्यांनी दिले आहे. 'हिंदी लोकांच्या राजकीय अथवा राष्ट्रीय शीलाविषयीं तिरस्कार, हल्लींहि (१९१४ सालीं) त्यांच्या हाती अवशिष्ट असलेल्या राजसत्तेच्या जुलमीपणाची स्पष्ट जाणीव, व इंग्रजी