पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४६
भारतीय लोकसत्ता

ब्राह्मणेतरांचा बचाव करण्याचें सामर्थ्य, ब्राह्मणेतर पुढाऱ्यांच्या मतें, त्यांच्या समाजाच्या ठायीं नसून ते इंग्रजांच्या ठायींच फक्त आहे. त्यांचे राज्य जर गेले तर ब्राह्मण येथे पुन्हां विषमतेचा, उच्चनीचतेचा ब्राह्मणी धर्म रूढ करतील व ब्राह्मणी राज्य पुन्हां प्रस्थापित करतील. म्हणून इंग्रजी राज्याविरुद्ध चळवळ करणे हे घातक होय. भारती समाजाचा तिच्यामुळे नाश होईल. अशी भूमिका ब्राह्मणेतर समाजानें १९३०-३५ सालापर्यंत पतकरली होती. स्वामी धर्मतीर्थजी महाराज यांच्या १९४१ च्या ग्रंथांत हीच विचारसरणी प्रतिपादिलेली आहे. डॉ. आंबेडकरांच्या १९४५ च्या ग्रंथांतहि हीच भीति व्यक्तविलेली आहे. त्यानंतर आतां स्वातंत्र्यच आले आहे तेव्हां तसें प्रतिपादन कोणी केलेले ऐकिवांत येत नाहीं. पण लोकांच्या मनांतून हा विचार कितपत नष्ट झाला आहे ते सांगतां येत नाहीं.
 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मतें आर्य म्हणजे फक्त ब्राह्मण. बाकी सर्व शूद्र होत. राम, कृष्ण, शिवाजी सर्व शूद्र होत. बळी हा शूद्र असून ख्रिस्त हा त्याचाच अवतार होता. त्यामुळे सर्व ख्रिस्ती व म्हणूनच इंग्रजहि शूद्र होत. 'आम्हा शूद्रांच्या गळ्यांतील दास्यत्वाचा पट्टा इंग्रजांनी तोडला; मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदास यासारखे पायलींचे पंधरा व आधोलीचे सोळा संत झाले. पण त्यांतील एकानेंहि शूद्रांच्या गळ्यांतील दास्यत्वाच्या पट्ट्यास बोट लाविलें नाहीं. इंग्रजांनी मात्र आम्हांस सोडविलें. भट जो इंग्रजाविरुद्ध बंड करतो त्याचें कारण हेच होय. येथली शूद्र प्रजा व शुद्र इंग्रज यांच्या पुरत्या ओळखी होऊन पुढे जड जाईल म्हणून ब्राह्मणांनी इंग्रजांना हांकून लावण्याचा कट केला आहे. भट इंग्रजांविरुद्ध याच कारणास्तव द्वेष पसरतात. जीं बडे झालीं त्यांत भट अग्रेसर नाहीं असें एकहि नाहीं. पण इंग्रज कांहीं जन्माचे पुरणार नाहींत. तेव्हां ते आहेत तोपर्यंत भटांचें वर्चस्व मोडून स्वराज्य स्थापावें'- अशा तऱ्हेचे प्रतिपादन महात्मा फुले यांचें असें. (गुलामगिरी पृ. ५९, ६१, ८२) त्या काळी लोकहितवादी, रानडे, दादाभाई यांची इंग्रज हेच आपले उद्धारकर्ते, अशी श्रद्धा होती. त्यांच्या मनांतील अर्थ असा की समाजरचना, राजकारण, अर्थव्यवस्था यांचें ज्ञान आम्हांला नाहीं. इंग्रजांच्या नेतृत्वाने त्या तत्त्वाचा अभ्यास होऊन प्रत्यक्ष व्यावहारिक धडेहि आम्हांला मिळतील. मग आम्ही कार्यक्षम होऊं व