पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४५
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

 ब्राह्मणब्राह्मणेतरवादांत ब्राह्मणेतर पक्षाच्या थोर धुरीणांनीं जी भूमिका स्वीकारली आहे तिच्यांतील मुख्य सिद्धांताचा येथवर विचार केला. हिंदुस्थानांतील सर्व अपयशाला, अवनतीला ब्राह्मणच जबाबदार आहेत असे सिद्ध करून स्वतःला त्या अपश्रेयांतून मुक्त करून घेण्याच्या भरांत या पंडितांनीं क्षत्रिय समाजाच्या मनःसामर्थ्याचे व बुद्धिबलाचे जे मापन केलें आहे व त्याचे जे चित्र रंगविलें आहे ते किती अनर्थकारक व अवमानकारक आहे हे त्यावरून दिसून येईल. ब्राह्मणांची दुष्ट बुद्धि, त्यांची कारस्थानें, त्यांचे घातकी व्यूह यांचे जे वर्णन त्यांनी केले आहे ते सर्व खरे मानले तर वेदकालापासून आतांपर्यंतचा क्षत्रिय समाज हा कर्तृत्व नसलेला, दुसऱ्याच्या चिथावणीनें वाटेल तो आत्मघात व राष्ट्रघात करण्यास प्रवृत्त होणारा, स्वतःच्या सार्वजनिक व कौटुंबिक जीवनांतहि ब्राह्मणांचे वर्चस्व सहन करणारा व सर्वस्वी ब्राह्मणांच्या आहारी जाऊन, हातीं राजसत्ता असतांनाहि दीन- दुबळा झालेला होता, अशी विचित्र इतिहासमीमांसा आपल्याला पतकरावी लागते. कोणचाहि स्वाभिमानी मराठा ती पत्करील असे वाटत नाहीं.

इंग्रज आपला उद्धारकर्ता

 ब्राह्मणेतर पक्षाने स्वीकारलेली ही भूमिका केवळ तात्त्विक असती, पूर्व इतिहासांतील ब्राह्मण व ब्राह्मणेतरांच्या संबंधांविषयींचे एक विद्वानाचें मत, एवढेच तिचे महत्त्व असते तर लोकशाहीच्या विवेचनांत त्याला एवढे स्थान देण्याचे कारण पडले नसतें. पण दुर्दैवानें तसे नाहीं. भारताच्या इतिहासावर ब्राह्मणेतरांनी स्वीकारिलेल्या भूमिकेचा अत्यंत घातक असा परिणाम झालेला आहे. ब्राह्मणांनीं गेली सात आठ हजार वर्षे या भूमीवर आपली सत्ता चालविली. आपला विषमतेचा ब्राह्मणी धर्म रूढ करून आम्हां सर्वं ब्राह्मणेतरांना पिळून काढले व आमच्यांत दुही निर्माण करून, आम्हांला अज्ञानांत ठेवून सर्वस्वी हीन दीन करून टाकले, ही भूमिका ब्राह्मणेतरानी केवळ तात्विक म्हणून स्वीकारली नाहीं, तर तिच्यांतून अपरिहार्यपणे निघणारा दुसरा एक सिद्धांत त्यांनी असा काढला कीं, ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांचें असें बलाबल असल्यामुळे हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य राहिले तरच ब्राह्मणेतरांचा उत्कर्ष होईल. ब्राह्मणांच्या दुष्ट शक्तीपासून