पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४४
भारतीय लोकसत्ता

आहारी जाण्यास भाग पाडते? बंगालचें उदाहरण पहा. नवी पाश्चात्य विद्या हें उत्कर्षाचे साधन आहे, ती यशाची गुरुकिल्ली आहे, ती संजीवनी आहे हें तेथील ब्राह्मणेतरांच्या ध्यानांत येतांच तेथील अनेक श्रीमंत घराण्यांनी त्या विद्येचा ध्यास घेऊन आपली मुले लहानपणापासून इंग्लंडमध्ये पाठविण्यास सुरवात केली. त्यामुळे बंगालमध्ये रॉय, चतर्जी, बॅनर्जी, टागोर या ब्राह्मण घराण्याप्रमाणेच घोष, बोस, पाल, दत्त हीहि घराणी विद्यासंपन्न झाली. आणि लालमोहन, आनंदमोहन, रासबिहारी, अरविंद, बारींद्रकुमार घोष, रमेशचंद्र दत्त, नरेन्द्रनाथ दत्त, (स्वामी विवेकानंद) जगदीशचंद्र, सुभाषचंद्र असे एकेक रथी महारथी त्यांच्यांत निर्माण झाले. महाराष्ट्रांतील मराठा घराण्यांनी विद्येचा असा ध्यास घेतला असता तर ? महाराष्ट्र, बडोदें, इंदूर, ग्वाल्हेर हे सर्व प्रांत मिळून, इंग्लंडमध्ये आपल्या मुलांना पाठवून शिक्षण देऊ शकतील अर्शी शंभर एक घराणी सहज होतीं. त्यांनी हे धोरण ठेविले असते॑ तर महाराष्ट्रांत ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद निर्माणच झाला नसता. कारण मग जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मराठेच आघाडीवर राहिले असते. पण ज्योतिबांनी दांतांच्या कण्या करून शिक्षणाचे महत्त्व सांगितले तरी ब्राह्मणेतर समाजाच्या मनावर व त्यांतील नेतृत्व करणारा जो मराठावर्ग त्याच्या मनावर ते ठसलेच नाहीं. जनरल नानासाहेब शिंदे यांनी आत्मचरित्रांत अनेक ठिकाणीं ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे. श्रीमंत सयाजीराव, श्रीमंत माधवराव शिंदे याबाबतीत फार निराश असत. त्यांनीं मराठयांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले. विलायतला जाण्याचा खर्चहि अनेकांना त्यांनी देऊ केला, दिला. पण त्यांच्यांत पाश्चात्य विद्येची अभिरुचि निर्माण झाली नाहीं. त्या विद्येचे सामर्थ्य, तिची महती त्यांना कळावी तशी कळली नाहीं. बंगाल्यांतील घोष, बोस, दत्त या घराण्यांप्रमाणे त्यांनी उपक्रम केला असता, इंग्लंड दूर राहू द्या- येथल्या युनिव्हर्सिट्यांत आपल्या मुलांना उच्च शिक्षण द्यावयाचे त्यांनी ठरविले असते तर त्यांना प्रतिबंध करणे ब्राह्मणांना कालत्रयीं शक्य झाले नसते. पण तसे सामर्थ्य ब्राह्मणांच्या अंगीं आहे, त्यांचा प्रतिबंध असतांना आपणाला शिक्षण घेणे शक्य नाहीं, हीच भूमिका त्यांनीं पतकरली आणि अजूनहि तीच सत्य होती असे ते मानीत आहेत.