पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४३
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

काळांत जिला विद्या असें म्हणतात, ती कोणाजवळ शिल्लक नव्हती. मागल्या काळांत पाणिनि, पतंजली, नागार्जुन, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, शंकराचार्य, कुमारिल भट्ट, भास्कराचार्य, इ. अनेक भाष्यकार, गणितज्ञ, अनेक साहित्यशास्त्रज्ञ जसे उदयास आले त्याप्रमाणे पुढील काळांत कोणीहि झाले नाहींत. त्यानंतर विद्याव्यासंगाला खरी चालना मिळाली ती ब्रिटिशांचें राज्य आल्यानंतर. त्यानंतरच्या काळांत ब्राह्मणेतरांनी सर्व सामर्थ्य अंगी असून व सर्व साधनें हाताशीं सुलभ असूनहि दीन दुबळी भूमिका कशी पतकरली आहे ते पहा. महात्मा ज्योतिराव फुले यांचें प्रारंभीचे मुख्य कार्य हें की त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा उघडल्या. आतां सनातन ब्राह्मण व स्पृश्य समाज यांचा भयंकर विरोध असतांना जे मराठे अस्पृश्यांना विद्या देण्याची व्यस्था करतात त्यांनी आम्हांला ब्राह्मणांनी विद्येपासून ठेविले अशी तक्रार करणे म्हणजे जाणूनबूजून स्वतःवर दैन्य व दौर्बल्य ओढवून घेण्यासारखें नाहीं काय ? १८८० सालानंतर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी ब्राह्मणेतरांना, विशेषतः मराठ्यांना शिक्षण देण्यासाठी अट्टाहास चालविला होता. वसतिगृहें, शिष्यवृत्त्या, मोफत शाळा अशा सर्व प्रकारांनी ते साह्य करीत होते. तेच प्रयत्न ग्वाल्हेर, इंदूर व कोल्हापूर येथे १८९० सालापासून चालू झाले. ही अनुकूलता असूनहि ब्राह्मणेतरांनीं विद्याक्षेत्रांत निर्णायक शक्ति ब्राह्मणांच्या हाती आहे असे म्हणावें ही भूमिका आत्म-प्रत्ययाची, जागृततेची व स्वावलंबनाची आहे काय ? या काळांत महाराष्ट्रभर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षणप्रसारक मंडळी, आर्यन एज्युकेशन सोसायटी यांसारख्या शिक्षणसंस्था प्रस्थापित झाल्या होत्या. त्यांत ब्राह्मणेतरांना केव्हांहि मज्जाव नव्हता. डेक्कन एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष स्वतः राजर्षि शाहू हेच होते. या संस्थेने सर्व समाजाला शिक्षण सुलभ केलें असे त्या वेळच्या गव्हर्नरांनीं- लॉर्ड सँढर्स्ट- यानी प्रशस्तिपत्रहि दिले आहे. असें असूनहि भाऊराव पाटील यांचे चरित्रकार ब्राह्मणांनी आपल्या मुला-मुलींची फक्त सोय केली असें म्हणतात. इतक्या सोयी, इतकी संधि, इतकीं साधनें ब्राह्मणेतरांना अनुकूल असूनहि ब्राह्मण त्यांना विद्येपासून दूर ठेवू शकतो, असें ब्राह्मणाचें अद्भुत सामर्थ्य तरी काय आहे आणि अशी ब्राह्मणेतरांची दुर्बलता तरी कोणची की जी त्यांना सारखी ब्राह्मणांच्या