पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४२
भारतीय लोकसत्ता

गौरव करणारे ब्राह्मणांच्यावर हाच आरोप करीत आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही कीं ब्रिटिश राज्य प्रस्थापित झाल्यानंतरच्या काळांतहि ब्राह्मणांनी इतरांना विद्याहीन ठेवले असा ब्राह्मणांच्यावर आरोप आहे. ब्राह्मणांनी असें केले की नाहीं हा मुद्दा वेगळा आहे. संस्कृतविद्या ब्राह्मणेतरांना देऊं नये अशी सनातन ब्राह्मणांची संकुचित दृष्टि होती यांत शंकाच नाहीं. अर्थात् पाश्चात्यविद्या सर्व समाजांत प्रसृत करण्याचे प्रयत्नहि भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी यांच्या काळापासून अनेक ब्राह्मण करीत आले आहेत, हेंहि विसरून चालणार नाहीं. पण आपला आतांचा विषय तो नाहीं. प्रा. लठ्ठे यांनी राजर्षि शाहू यांचे चरित्र लिहिले आहे त्याला फ्रेझर नामक इंग्रज अधिकाऱ्यानें प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत त्यानें स्वच्छ म्हटलॆं आहे कीं, १८३३ सालीं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी शिक्षणाची व्यवस्था आपल्याकडे घेतली. त्यानंतर या क्षेत्रांतली ब्राह्मणांची मक्तेदारी समूळ नष्ट झाली, असे असूनहि नंतरच्या काळांत आम्हांला ब्राह्मणांनी विद्या मिळू दिली नाहीं, आणि म्हणून आमचा समाज मागासलेला राहिला अशी तक्रार करणे क्षत्रियांच्या स्वाभिमानाला, कर्तृत्वाला, स्वयंप्रेरणेला शोभेल काय, असा प्रश्न आहे. याहि बाबतींत त्यांनी दीन दुबळी अशीच भूमिका घेतली आहे.
 क्षत्रियांच्या मताप्रमाणेच वेद, उपनिषदें, महाभारत, रामायण हे भारताला भूषणभूत असलेले वाङ्मय त्यांनींच लिहिले आहे. तेव्हां त्या काळांत तरी ब्राह्मणांनीं विद्या दिली नाहीं, हा आरोप करता येणार नाहीं. पुढे ब्राह्मणांचें कर्मकांड वाढलें तेव्हां क्षत्रियांनी बौद्ध, जैन हे धर्म प्रस्थापित केले. या धर्माचें वर्चस्व हिंदुस्थानांत चवदाशें वर्षे होतें; अनेक राजे स्वतः बौद्धधर्मी होते. अनेक हिंदुराजे सर्व धर्माच्या पंडितांना सारखा आश्रय देत. तेव्हां या काळाबद्दलहि असा आरोप करता येणार नाहीं. पुढे दहाव्या शतकापासून संतवाङ्मयाचा काळ सुरू झाला. त्या काळांत अनेक संत ब्राह्मणेतरच होते. आणि वेदान्तज्ञान सर्व समाजांत पसरविण्याचे कार्य त्यांच्या बरोबरीने ब्राह्मण करीत होते. या काळांत दर वेळी सनातन ब्राह्मण वर्ग या ज्ञानप्रसाराला सारखा विरोध करीत होता हें खरें आहे. पण तितकाच मोठा ब्राह्मणवर्ग अट्टाहासानें शूद्रापर्यंत भागवतधर्माचा प्रसार करीत होता हेहि खरें आहे. यानंतरच्या