पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४१
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

बुद्धिमान्, इतका सामर्थ्यसंपन्न, इतका संघटनाकुशल आणि क्षत्रिय मात्र कायमचा भोळाभाबडा, बलहीन, विघटित असा होता. अशा तऱ्हेचे क्षत्रियांना अत्यंत अवमानकारक निष्कर्ष या इतिहासमीमांसेतून व ब्राह्मणेतरांनी स्वीकारलेल्या भूमिकेतून निघतात, क्षत्रियांनी ही पराभूततेची कल्पना कां पत्करावी ते कळत नाहीं. ब्राह्मण हे दुष्ट होते, कारस्थानी होते, नित्य घातक व्यूह रचीत, नित्य विनाशाच्या योजना आंखीत; पण आम्ही क्षत्रियांनी त्यांची कारस्थानें, त्यांचे व्यूह, त्यांच्या दुष्ट योजना हाणून पाडल्या अशी भूमिकाहि त्यांनी पत्करली नाहीं. नाश करण्यांत ब्राह्मणांना, क्षत्रिय हे राज्यकर्ते असूनहि, दर ठिकाणीं यश आलें; अशी दीन, दुबळी भूमिका त्यांनीं स्वीकारली आहे. सूर्यवंशासारख्या महान् राजवंशाचा अधःपात घडविण्यांत ब्राह्मणांना यश आलें. कौरवपांडवांमध्यें, त्यांच्यापैकी एका बाजूस, भीष्म-कर्ण व दुसऱ्या बाजूस कृष्णार्जुन असे प्रज्ञावंत महापुरुष असूनहि यादवी माजवून त्यांचा नाश करण्यांत ब्राह्मण यशस्वी झाला. रामाला वनवासांत घालवून देण्यांत व सीतात्याग करायला लावण्यांतहि त्याला यश आले. चंद्रगुप्त, अशोक, शिवाजी यांनाहि आपल्या 'गोमूत्राच्या गाडग्यांत' त्यांनी अडकवून टाकले. विषमतेचा धर्म प्रस्थापित करण्यांत, क्षत्रियांनाहि इतरांना हीन लेखावयास भाग पाडण्यांत ब्राह्मण यशस्वी झाले. दर ठिकाणी ब्राह्मणांनी आमच्यावर मात केली, अशी दैन्याची, दौर्बल्याची पराभूततेची भूमिका क्षत्रियांनीं, व ब्राह्मणेतर पंडितांनीं स्वीकारली आहे. याचे अत्यंत अनर्थकारक परिणाम सध्यांच्या काळांत झाले आहेत; पण ते सांगण्यापूर्वी ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना ज्ञानहीन ठेवले या तिसऱ्या आरोपाचा विचार करून टाकूं.

आम्हांस ज्ञानहीन ठेवलें

 ही भूमिकाहि अशीच दैन्याची व दुबळेपणाची आहे. 'भट लोकांनी तीन हजार वर्षे येथें राज्य केले. त्या काळांत येथल्या लोकांना ज्ञानहीन केलें व खोटे ग्रंथ लिहून शुद्र अतिशूद्र यांना फसविले' असे महात्मा फुले यांनी म्हटले आहे. प्रा. लठ्ठे यांनी छत्रपतिशाहूचरित्रांत वीसपंचवीस वेळा तरी हा आरोप केला आहे. आजहि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा