पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४०
भारतीय लोकसत्ता

पंडितांना मान्य नाहीं. धर्मतीर्थजींच्या मर्ते ॲनीबेझंट व त्यांची थिआसफीकल सोसायटी या ब्राम्हणी वर्चस्वाला बळी पडल्या होत्या म्हणूनच त्यांचे असे विचार झाले. आजच्या काँग्रेसबद्दल त्यांचें तेंच मत आहे. ते म्हणतात, काँग्रेस ही क्षत्रिय झुंजार वृत्तीची संस्था. पण जुन्या काळी मराठे, रजपूत यांचा जसा उपयोग ब्राह्मणांनी केला तसाच काँग्रेसचाहि उपयोग ते आज करीत आहेत.
 क्षत्रियांतील दुही, यादवी व हिंदुस्थानांतील जातिभेद आणि एकंदर धर्मशास्त्रांतील विषमतेचीं तत्त्वे यांच्या सर्व जबाबदारीतून ब्राह्मणेतर समाजाला मुक्त करण्याच्या प्रयत्नांत व ब्राम्हणांवर ती सर्व जबाबदारी लादण्याच्या भरांत ब्राम्हणेतर पंडितांनी एकंदर क्षत्रियवंशाची, त्यांतील थोर पुरुषांची व एकंदर ब्राह्मणेतर समाजाची काय अवस्था व बदनामी करून टाकली आहे ते वर सांगितले. आतां त्यांनी प्राचीन काळच्या ज्या घटना वर्णिल्या आहेत त्यांतून क्षत्रियांना बदनामीकारक असे आणखी किती निष्कर्ष निघतात ते पाहिले म्हणजे ही भूमिका कोणाहि ब्राह्मणेतराला मान्य होईल असे वाटत नाहीं. ब्राह्मण हा, या पंडितांच्या मतें, आज सहासात हजार वर्षे सर्व हिंदुस्थानभर वर्चस्व गाजवीत आहे. म्हणजे तो सारखा जागरूक, संघटित, व धूर्त असा असला पाहिजे. आणि क्षत्रिय मात्र एवढ्या काळांत सारखा विघटित, बेसावध, इतरांच्या सल्ल्याने वागणारा, स्वयंप्रेरणा नसलेला असा असला पाहिजे. ब्राह्मणांच्या विरुद्ध त्याला एकजूट करता आली नाहीं. त्यांची कारस्थानें तो ओळखूं शकला नाहीं. ब्राह्मणांनी उपनयन करण्याचे नाकारले तर त्यांच्यातील कोणालाहि द्रव्यानें, भीतीनें, भेदनीतीने फोडणे, त्यांच्यांत दुही माजविणे व कांहीं ब्राह्मण आपल्या बाजूचे करून ठेवणे आणि त्यांच्या साह्यानें तरी इतर ब्राह्मणांचीं कारस्थाने जाणून घेणें हें क्षत्रियांना कधींहि शक्य झाले नाहीं. क्षत्रियांत दुही माजविणे मात्र ब्राम्हणांना केव्हांहि शक्य होते. वास्तविक ब्राम्हणांच्या हातीं राजसत्ता अशी पेशवाईच्या काळी फक्त होती. आणि बंगालमध्ये नवव्या दहाव्या शतकांत कांहीं काळ ब्राह्मणी राज्ये होती. पण बाकी सर्वत्र व सर्व काळी राजसत्ता क्षत्रियांच्या हातीं होती. एवढी सत्ता इतक्या दीर्घकाल हातीं असूनहि क्षत्रियांना ब्राह्मणांपुढे हार खावी लागली. ब्राह्मण हा इतका