पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३९
सामाजिक पुनर्घटना- ब्राह्मण-ब्राह्मणेतर

उपनयन करण्याचें नाकारलें, पण त्यानंतर बत्तीस पिढ्यांनी रामचंद्र झालेला आहे. आणि रामानंतरहि बत्तीस पिढ्या हा वंश राज्य करीत होता. म्हणजे अध:पात झाला हेच खरें नाहीं. तरी ब्राह्मणांवर भडिमार करण्यासाठी आंबेडकरांनी या वंशाला अध:पतित ठरविले आणि इतर सर्व क्षत्रियांना नेभळे, स्वाभिमानशून्य व नाकर्ते ठविलें. रजपूत वंशांत बाप्पा रावळ, हम्मीर, पृथ्वीराज, संगराणा, राणाप्रताप यांसारखे महापुरुष होऊन गेले. पण प्रचलित कथा अशी आहे की रजपूत हे मूळचे परकी असून ब्राह्मणांनीं त्यांना क्षत्रियत्व दिलें. अर्थातच ते ब्राह्मणांना वंद्य मानीत. यामुळे या पंडितांनी सर्व रजपुतांना भाडोत्री, ध्येयशून्य, हीन ठरवून टाकले आहे. रजपूत हे इतिहासांत कशासाठी प्रसिद्ध असतील तर ध्येयनिष्ठा, क्षात्र तेज, अग्निदिव्य यासाठीं- यांच्या अतिरेकासाठीं होते. सहाशे वर्षे त्यांनी मुसलमानी आक्रमणाला टक्कर देऊन या भूमीचें रक्षण केले. पुढे ते थकले, त्यांनी हार खाली हें खरें. पण प्रा. लठ्ठे यांच्यामते त्यांनीं आठव्या शतकांतच हार खाल्ली व तेथून पुढे ते केवळ भाडोत्रीपणें लढत.
 या भयंकर भडिमारांतून शिवछत्रपतीहि सुटत नाहींत. 'ब्राह्मणी वर्चस्वांतून शिवाजीचें मन कधींच मुक्त होऊं शकले नाहीं,' असें स्वामी-धर्मतीर्थजी म्हणतात. पण ठाकरे यांचा हल्ला फारच प्रखर आहे. त्यांच्यामते कोल्हापूरचे राजर्षि शाहू छत्रपति हें शिवछत्रपतीपेक्षां पुष्कळच श्रेष्ठ होते. शाहू छत्रपतींनी जे कार्य केले ते शिवाजीनें केले असते तर त्यांच्यामते इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानावर झालेंच नसतें. पण ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध लढा करण्याची रग शिवाजींत नव्हती. ठाकरे म्हणतात, 'शिवाजीनें मराठी स्वराज्य स्थापन केले म्हणून आम्ही त्याचा गौरव करतो. पण तोहि भटी गोमूत्राच्या गाडग्यांत अडकून भटी ब्रह्मगाठींच्या आडाखेबाज फासांत डोळे उघडे ठेवून फांशी गेला' (शेतकऱ्यांचे स्वराज्य-पृ. ५६ ते ६०) श्रीमती ॲनी बेझंट यांचें नांव भारताच्या अर्वाचीन इतिहांत महशूर आहे. राजकीय क्षेत्रांत त्या अग्रस्थानी होत्या. पण जातिभेद, अस्पृश्यता यांचें त्यांनीं कांहींसें समर्थन केले आहे. यासाठीं ब्राह्मणेतरांनीं स्वतंत्रपणें त्यांना प्रतिगामी ठरविण्यास हरकत नव्हती. पण ब्राह्मणांना व जातिभेदाला अनुकूल असणारे ब्राह्मणेतर स्वतंत्रपणे विचार करूं शकतात हेंच या ब्राम्हणेतर