पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३८
भारतीय लोकसत्ता

भेकडपणा, ध्येयशून्यता हे अतिशय निंद्य गुण हे पंडित त्यांच्या अंगी अभावितपणे चिकटवीत आहेत. ही भूमिका कितपत श्लाध्य आहे ?
 आज या ब्राह्मणेतर पंडितांचें ब्राह्मणांविषयीं अत्यंत हीन मत आहे. मागल्या काळच्या अनेक थोर क्षत्रिय वीरांचे मत तसें नव्हते, पण त्यांना ते मतस्वातंत्र्य देण्यास हे पंडित तयार नाहींत. मागल्या काळी ज्यांनी ज्यांनीं ब्राह्मणांविषय आदरभाव व्यक्त केला व त्यांना वंद्य मानले त्या सर्व क्षत्रिय वीरांची वाटेल ती निंदा करण्यास हे पंडित कमी करीत नाहींत. 'हू वेअर दि शूद्राज्' हा डॉ. आंबेडकरांचा ग्रंथ पहा. त्यांच्या मतें शूद्र हा शब्द आजच्याप्रमाणे हीनजातिवाचक नव्हता. शूद्र हें एका थोर क्षत्रिय वंशाच्या शाखेचें नांव होर्ते. सूर्यवंशीय राजे ही ती शाखा होय. वसिष्ठ हे या वंशाचे गुरु. पण पुढे ब्राह्मण फार गर्विष्ठ झाले; ते क्षत्रियांना तुच्छ लेखूं लागले. ते सूर्यकुलांतल्या राजांना सहन होईना. म्हणून त्यांनीं ब्राह्मणांविरुद्ध जाऊन त्यांच्यावर अत्याचार केले. तेव्हां ब्राह्मणांनीं सूडबुद्धीनें सूर्यवंशीय राजांचा उपनयनसंस्कार करण्याचे नाकारले. आणि उपनयन नाहीं म्हणजे द्विजत्व नाहीं, असा प्रकार होऊन या सूर्यवंशीय शूद्र राजांचा अधःपात झाला. ते आपल्या श्रेष्ठपदावरून खाली आले. आंबेडकरांच्या ग्रंथाचा तात्पर्यार्थ असा आहे. आतां त्यांच्या या सिद्धांतावर अनेक शंका येतील. त्यांचें निरसन करतांना व ब्राह्मणांवर भडिमार करतांना आंबेडकर क्षत्रियांविषयीं काय अभिप्राय प्रगट करतात ते पहा. सूर्यवंशीय राजांना ब्राह्मणांचा उन्मत्तपणा सहन होईना म्हणून ते त्यांच्याविरुद्ध गेले. मग इतर वंशांतल्या- चंद्रवंश, हैहय वंश- या वंशांतल्या राजांनी हेच धोरण कां अवलंबिलें नाहीं, ते ब्राह्मणाचा आदर कां करीत राहिले, असा प्रश्न येतो. आंबेडकर म्हणतात हे सर्व राजे नेभळे, नाकर्ते, स्वाभिमानशून्य असे होते. चंद्रवंशांत दुष्यंत, भरत, भीष्म, श्रीकृष्ण, अर्जुन, भीम, युधिष्ठिर असे थोर क्षात्रवीर होऊन गेले. हे सर्व स्वाभिमानशून्य, नेभळे, नाकर्ते होते हा निर्णय ब्राह्मणेतरांना मान्य आहे काय ? सूर्यवंशाचा अधःपात झाला म्हणजे काय, हें आंबेडकरांनीं स्पष्ट केलेले नाहीं. ब्राह्मणक्षत्रिय हा वाद प्रथम वेदकालांतील दिवोदाससुदास यांच्यावेळी सुरू झाला, असें डॉक्टरसाहेब म्हणतात. हरिश्चंद्राच्या वेळीं तो विकोपास गेला. तेव्हांच ब्राह्मणांनी