पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
भारतीय लोकसत्ता

ग्रंथांवर भाष्ये लिहिली गेलीं आहेत; पण यांत चुकूनसुद्धां हजार वर्षेपर्यंत या देशांत चालू असलेल्या एका महनीय शासनपद्धतीचें वर्णन वा विवेचन सांपडत नाहीं, हे अत्यंत आश्चर्यजनक आणि तितकेच दुःखदायक आहे. परपरा न टिकण्याचें हें प्रधान कारण म्हणून सांगतां येईल; पण साहित्यिकांनी या गणराज्यावर असा संघटित बहिष्कार का घालावा, हें कोडें उलगडणे अशक्य आहे. प्रतिपक्षाचे तत्त्वज्ञान म्हणून खंडनासाठीं तरी त्यांनी त्याचे परिशीलन करणे अवश्य होते. वेदान्ती लोकांनी इतर पंथीयांची अशी दखल घेतलेली आहे; पण तसासुद्धां मान या गणराज्यांना तत्त्ववेत्त्यांनी दिलेला नाहीं. महाभारतांत त्यांचा नाश कां होतो, याच थोडें विवेचन आहे आणि चाणक्याच्या अर्थशास्त्रांत त्यांची कांहीं चेष्टा आहे; इतकेच काय ते. शंकराचार्य, कुमारिल भट्ट, रामानुजाचार्य यांनी व यांच्या शिष्यांनी विरुद्ध पक्षाच्या खंडनासाठीं जसे विवेचनात्मक शेकडों ग्रंथ लिहिले, तसे राजसत्तेच्या पुरस्कर्त्यांनी लोकसत्तेच्या खंडनार्थ मूलगामी विवरण करणारे ग्रंथ लिहिले नाहींत. त्यांनी आपल्या ग्रंथांत राजसत्तेची महती गायिली आहे व मधूनमधून अराजकाचा निषेध केला आहे. गणराज्यांचा ते निर्देशहि करीत नाहीत. माझ्या मतें यार्चे प्रमुख कारण म्हणजे प्रजासत्ताकाच्या पुरस्कर्त्यांनीं आपले व्यक्तिस्वातंत्र्याचें, समतेचें, राजसत्तेच्या नियंत्रणाचे तत्त्वज्ञान लिहिलें नाहीं, हेच होय. ते त्यांनी लिहिले असतें, प्रसृत केले असते तर गणराज्याच्या परंपरा येथे टिकल्या असत्या आणि कांहीं आपत्ती येऊन गणराज्यांवर जरी विनाशाचा प्रसंग ओढवला असता तरी, युरोपमध्ये ज्याप्रमाणे ग्रीक व रोमन ग्रंथकारांच्या तत्त्वज्ञानांतून तेराव्या- चवदाव्या शतकांत अथीनी व रोमन लोकसत्तांचें सर्वत्र पुनरुज्जीवन झाले, तसे येथे झाले असते; पण तत्त्वज्ञानाच्या अभावी जडयंत्रणा परंपरासातत्य टिकविण्यास असमर्थ ठरली आणि त्यामुळे या भूमीची अपरिमित अशी हानी झाली.
 इ. स. १००० नंतर या भूमीत तमोयुग सुरू होऊन सर्वत्र अंधारच पसरला. या सुमारास मुसलमानांची आक्रमणे सुरू झाली आणि याच सुमारास सर्व हिंदुस्थानभर संत-वाङ्मयाने निवृत्तिवाद प्रसृत करून दिला. त्यामुळे ऐहिक जीवनाविषयीं सर्वत्र उदासीनता, अलिप्तता व निराशा